मुंबई -मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आमने-सामने आले होते. त्यावेळी तुफान राडा झाला होता. यानंतर माहीम पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. लपूनछपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणं, यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे, असे म्हणत शेलार यांनी सेनेवर वार केला आहे.
प्रतिक्रिया देताना भाजप आमदार आशिष शेलार अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामात जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. यावरुन शिवसेनेने भाजपवर केलेल्या टीकेमुळे भाजप संतापली होती. या मुद्यावरूनच आज शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. यानंतर भाजपचे कार्यकर्ते माहीम पोलीस स्टेशन येथे दाखल झाले होते.
- शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप -
मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनाही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी शिवसेना आता त्यांच्याविरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
- शिवसेना भवन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासा -
ज्या शिवसैनिकांनी शांततेत मोर्चा काढणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आशिष शेलार माहीम पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शिवसेना भवन परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्याची मागणीही पोलिसांकडे केली आहे.