मुंबई - -शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज रविवार (दि. 31 जुलै)रोजी सकाळी 7 वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. गेल्या नऊ तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरु होती. अखेर, ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. संजय राऊत तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. दरम्यान, संजय राऊत यांना ताब्यात घेतले असले तरी त्यांना अटक केलेली नाही. ( Vinayak Raut met Sanjay Raut at ED office ) नुकतेच, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ईडी कार्यालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर, आम्ही ईडी किंवा सरकारसमोर झुकणार नाही. आम्ही शिवसेनेसाठी लढत राहू. आम्हाला त्यांचा संजय राऊत यांचा अभिमान आहे, त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण? -ईडीने पत्राचाळ प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना अटक केली होती. ते गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार सन २०१० मध्ये करण्यात आला होता.