मुंबई : देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणूक सुरु आहे. निष्पक्ष निवडणूक घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारीच नाही तर कर्तव्य मानले जाते. मात्र मागील काही निवडणुकांपासून आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल विरोधीपक्ष कायम साशंक राहिले आहेत. सध्या सुरु असलेल्या आसाम विधानसभा निवडणुकीतील एक धक्कादायक प्रकार संपूर्ण देशाने पाहिला. येथील पाथारकंडी विधानसभा मतदारसंघातील मतदानानंतर ईव्हीएम मशीन भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवाराच्या कारमध्ये सापडल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर ते कारला आडवे झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असली तरी या प्रकारानंतर आयोगावरील शंकांचे ढग यामुळे गडद होत चालले आहे, यावरुनच शिवसेनेने निवडणूक आयोग 'राज्यकर्त्या पक्षाचा विकलांग ताबेदार' झाल्याची खरमरीत टीका केली आहे. दैनिक सामनामध्ये 'निवडणूक आयोगाची झोलबाजी!' या अग्रलेखातून आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
'आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरी'
अग्रलेखात म्हटले आहे, 'अत्यंत व्यथित मनाने सांगावेसे वाटते की, आपल्या देशाचा निवडणूक आयोग मृत झाला आहे किंवा राज्यकर्त्या पक्षाच्या हुकमाचा विकलांग ताबेदार बनला आहे. निवडणूक आयोगाच्या नियम पुस्तकातील निष्पक्षतावाले पान मोदी सरकारने फाडून फेकून दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी चिंता प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.'
'निवडणूक आयोगाने निवडणुकांत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या भूमिकेत वावरू नये या अपेक्षेला येथे तडे गेले आहेत. आसामातील ताजी घटना धक्कादायक आहे. पथारकांडी मतदारसंघात निवडणूक आयोगाची गाडी भररस्त्यात खराब झाली. त्या गाडीत मतदान संपल्यानंतर जमा केलेल्या 'ईव्हीएम' होत्या. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडताच तेथे एक गाडी प्रकट झाली. त्या गाडीत निवडणूक आयोगाचे अधिकारी 'ईव्हीएम'सह बसले व रवाना झाले. ही गाडी त्याच मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची होती. काय हा योगायोग? 'ईव्हीएम' नेण्यासाठी निवडणूक आयोगास दुसरी गाडीच त्या वेळी मिळू नये? निवडणूक आयोगाची ही भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची आहे. या सर्व प्रकरणात निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपचा मुखवटा फाटला आहे. निवडणूक आयोग पक्षपाती आहे हे सिद्ध करणाऱया घडामोडी रोज घडत आहेत.