मुंबई - महाराष्ट्राच्या सातव्या विधानसभेसाठी व २८८ जागांसाठी २ मार्च १९८५ रोजी मतदान झाले. १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व राजीव गांधींकडे आले होते. त्यांच्या पुढाकाराने शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस आय मध्ये विलीनीकरण केले होते. त्यानंतर १९८५ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली. इंदिरा गांधी हत्येनंतर राजीव गांधींना देशभरातून सहानुभूती मिळाली व १९८४ च्या निवडणुकीत ५४३ जागांपैकी तब्बल ४०१ जागा काँग्रेसने जिंकल्या. यावेळी भाजपला केवळ २ जागा मिळाल्या. काँग्रेसला असे घवघवीत यश महाराष्ट्रात मिळू शकले नाही. मागच्या वेळपेक्षा कमी जागा काँग्रेसला यावेळी मिळाल्या.
महाराष्ट्राची सातवी विधानसभा निवडणूक -
महाराष्ट्राच्या सातव्या विधानसभेवेळी म्हणजे १९८५ मध्ये नोंदणीकृत मतदारांची संख्या ३ कोटी ७७ लाख ८१ हजार ६२५ इतकी होती. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी ९४ लाख ३२ हजार ९१३ तर महिला मतदारांची संख्या होती १ कोटी ८३ लाख ४८ हजार ७१२. त्यापैकी ५९.१७ टक्के म्हणजे २ कोटी, २३ लाख ५६ हजार ६३२ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. २८८ जागांसाठी एकूण २२३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या होती ८३ त्यापैकी १६ महिला उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या. या निवडणुकीत १६०० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
१९७२ च्या निवडणुकीत एकूण २८८ पैकी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची संख्या होती २४८ त्यानंतर अनुसुचित जाती १८व अनुसुचित जमाती प्रवर्गातून २२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ४ लाख २१ हजार ८९० मते बाद ठरविण्यात आली याची टक्केवारी १.८९ टक्के इतकी होती. ही निवडणूक घेण्यासाठी ४४,५५९ मतदान केंद्रे उघडण्यात आली होती. या निवडणुकीत २८८ पैकी तब्बल १६१ जागा जिंकून काँग्रेसने राज्यातील सत्ता पुन्हा मिळवली.
MAHA VIDHAN SABHA : शरद पवारांची पहिली निवडणूक.. विक्रमी विजय अन् काँग्रेसचे विभाजन
१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. त्यातच १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकीसोबत महराष्ट्रासह १० राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने १६१ जागा जिंकल्या तर पुलोदने १०४ जागांवर वर्चस्व राखले. यामध्ये समाजवादी काँग्रेस ५५,जनता पक्ष -२० , भाजप १६ व शेकापने १३ जागा मिळवल्या होत्या. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्यामुळे वसंतदादा पाटील यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत २० अपक्ष उमेदवारही निवडून आले होते.
शिवसेना-भाजप युतीची बीजे व काश्मीर कनेक्शन -
१९८५ ते १९९० च्या काळात शिवसेनेने आपला प्रसार व प्रभाव वाढविण्यासाठी ग्रामीण भागात शाखा विस्ताराचा कार्यक्रम सुरू केला होता. शिवसेना स्थापन झाली होती. त्यावेळी त्यांच्या अजेंड्यावर हिंदुत्व हा मुद्दा नव्हता. केवळ मराठी अस्मितेसाठी शिवसेना स्थापन झाली होती. मात्र ब्रिटनमध्ये भारतीय दुतावास अधिकारी असलेले मराठी व्यक्ती रवींद्र म्हात्रे यांचे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेने बर्मिघम येथून अपहरण केले व मकबुल भट्ट या दहशतवाद्याला सोडण्याची मागणी केली. अपहरणानंतर दहशतवाद्यांनी ४९ वर्षीय म्हात्रेंची हत्या केली.
MAHA VIDHAN SABHA : स्वतंत्र महाराष्ट्राची पहिली निवडणूक.. तीन मुख्यमंत्री अन् शिवसेनेचा उदय
शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण -
१० मार्च १९८५ मध्ये वसंतदादा पाटील यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदीची शपथ घेतली. मात्र काँग्रेसने त्यांची नियुक्ती राजस्थानच्या राज्यपालपदी केल्याने ३ जून १९८५ रोजी मराठवाड्याचे नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले. त्यानंतर ६ मार्च १९८६ रोजी निलंगेकर यांच्या जागी शंकरराव चव्हाण यांची त्या जागी नियुक्ती झाली. डिसेंबर १९८६ मध्ये औरंगाबादच्या मेळाव्यात शरद पवार यांनी आपली समाजवादी काँग्रेसचे भारतीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून राजीव गांधींचे नेतृत्व मान्य केले. त्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी दिल्लीला बोलावून घेतल्याने शरद पवारांच्या हाती राज्यशकट आहे. पवार १९९० च्या निवडणुकीपर्यंत या पदावर होते. पवारांच्या नेतृत्वातच १९९० च्या निवडणुका लढल्या गेल्या.
वसंतदादा पाटील यांची चौथी टर्म -
सहाव्या विधानसभेत २ फेब्रुवारी १९८३ ते ९ मार्च १९८५ पर्यंत मुख्यमंत्री राहिल्यानंतर १९८५ च्या विधानसभा निवडणुका वसंतदादांच्या नेतृत्वात लढविल्या गेल्या. त्यानंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर १० मार्च १९८५ मध्ये चौथ्यांदा वसंतदादांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दादांनी आपल्या कारकीर्दीत शेतकऱ्यांदा कमी व्याजदराने कर्ज, थकबाकी माफीचा विचार, वीज उत्पादनामध्ये ८.५५ टक्के वाढ आदि शेतकऱ्यांच्या बाजुचे निर्णय घेतले.
MAHA VIDHAN SABHA : द्विभाषिक राज्याची पहिली निवडणूक आणि महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’
दरम्यान वसंतदादा पाटील व राजीव गांधी यांच्यातील मतभेत वाढत होते. याच संघर्षातून १९८५ मध्ये वसंतदादांनी केंद्र सरकार मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याच्या विचारात असल्याचा आरोप केला. या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेत काँग्रेसचा दारूण पराभव झाला व शिवसेनेने तेव्हापासून मुंबई महापालिकेवर आपली पकड घट्ट केली. त्याचबरोबर वसंतदादाच्या मनाविरुद्ध प्रभा राव यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमले, यामुळे वसंतदादांनी २ जून १९८५ रोजी आपल्या पदाची राजीनामा दिला. २० नोव्हेंबर १९८५ मध्ये त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली गेली. त्यानंतर २४ नोव्हेंबर १९८६ मध्ये वसंतदादांचे निधन झाले.
१३ वे मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर -
३ जून १९८५ रोजी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेतेपदी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली. याचा प्रस्ताव वसंतदादांनीच ठेवला होता. याला सुशीलकुमार शिंदे व सुधाकर नाईक यांनी दुजोरा दिला होता. त्यावेळी निलंगेकर विधानसभेचे सदस्य नव्हते व त्याचबरोबर मराठवाड्याचे दुसरे नेते शंकरराव चव्हाण यांच्याशी त्यांचे उघड वैर होते.
१९७७ मध्ये निलंगेकर यांनी वसंतदादा मंत्रिमंडळात आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्रालय सांभाळले होते. १९८० मध्ये अंतुले मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, तंत्रशिक्षण, दुग्धविकास व रोजगार खाते निलंगेकरांकडे होते.