मुंबई -संयुक्त पुरोगामीमहाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात राज्यपालांनी तातडीने मदतीसाठी हस्तक्षेप करावा, आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळवून द्यावी. तसेच, शेतकऱ्यांचे वीज बील, पीक कर्ज माफ करावे आदी मागण्या आम्ही राज्यपालांकडे केल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.
राज्यपालांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, नवाब मलिक,धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड; तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात,अमित देशमुख, धिरज देशमुख, शरद रणपिसे आणि हुस्नबानू खालीफे उपस्थित होते.
संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोशयारी भेट घेतली 'शेतकरी मोडला तर राज्यही मोडेल'
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे, हा शेतकरी आमचा पोशिंदा आहे. तो पोशिंदा मोडला तर हे सरकार पडेल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राजभवन येथे माध्यमांशी बोलताना दिला. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळत नाही, म्हणून राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढलेले असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे.अशात महायुतीचा सत्ता स्थापन करण्यासाठी खेळ सुरू आहे. बहुमत मिळूनही हे लोक सत्ता स्थापन करत नाहित, शेतकरी उध्वस्त झाला आहे, याचे यांना काहीही पडले नाही. गेल्या दहा दिवसांमध्ये युतीचे जे काही चालले आहे, त्यावरून हेच लक्षात येत आहे की, त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येपेक्षा मुख्यमंत्री कोण होणार याचीच जास्त काळजी लागली आहे, असे म्हणत अजित पवार यांनी महायुतीवर टीका केली.
दहा हजार कोटींची मदत तुटपुंजी...
परतीच्या पावसामुळे तसेच वादळांमुळे महाराष्ट्रातील सुमारे सर्वच भागांमध्ये मिळून सुमारे दीड कोटी एकरापेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपुढे सरकारने जाहीर केलेली दहा हजार कोटींची मदत अगदी तुटपुंजी आहे. जवळपास २५ हजार कोटींपेक्षा जास्त मदतीची गरज असल्याचे आम्ही राज्यपालांना सांगितल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच पंचनाम्यासाठी असलेली ६ तारखेपर्यंतची मुदतही वाढवून मागितल्याची माहिती त्यांनी दिली.
द्राक्ष, डाळींब आणि संत्र्याच्या बागांसाठी दीड ते दोन लाख प्रती हेक्टर, तर इतर खरिपांच्या पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. काळजीवाहू सरकार याकडे लक्ष देत नाही; नवीन सरकार कधी स्थापन होते हे कळायला मार्ग नाही, त्यामुळे राज्यपालांनी यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर मदत मिळवून द्यायला हवी.
मच्छिमारांचेही नुकसान..
महाराष्ट्राला असणाऱ्या ७०० किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. सलग दोन वादळांमुळे मच्छिमारांना समुद्रात जाता येत नाही, त्यामुळे मच्छिमारांनाही सरकारने मदत जाहीर करावी. यासोबतच, शेतकऱ्यांचे पीक कर्जासह वीज बीलही माफ करावे; पशुधन आणि घरांच्या पडझडीचेही पंचनामे करावे, अशी मागणी महाआघाडीने राज्यपालांकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
सांगली-कोल्हापूरचा वाईट अनुभव..
सांगली-कोल्हापूर आणि सातारा भागात आलेल्या महापुरावेळी सरकारने सहा हजार कोटींची मदत जाहीर केली होती. ती मदत अजूनही तिथल्या लोकांना मिळालेली नाही. आता जाहीर केलेल्या मदतीसह ती मदतही सरकारने तातडीने लोकांना द्यावी. केंद्राकडून पैसे येतील, विमा कंपन्यांकडून येतील, याची वाट न पाहता सेफ अॅडव्हान्स काढून तातडीने लोकांना मदत द्यावी, अशी मागणीही महाआघाडीतर्फे राज्यपालांना केल्याचे पवार यांनी सांगितले.
काळजीवाहू सरकारच काळजी करत नाही...
महाराष्ट्रामध्ये अतीवृष्टीचे भयानक संकट आले आहे. अशा वेळी सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे. मात्र, हे काळजीवाहू सरकारच शेतकऱ्यांची काळजी करत नाही, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले.