मुंबई - दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आझाद मैदानात तीन दिवस आंदोलन -
केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे अन्यायकारक असून हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी गेल्या ५५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टाने या कायद्यांना स्थगिती दिली असून दुसरीकडे शेतकरी प्रतिनिधी आणि सरकारमधील चर्चा पुन्हा-पुन्हा निष्फळ ठरत आहेत. या प्रश्नी तिढा कायम असतानाच देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा वाढत आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानात तीन दिवस आंदोलन केलं जाणार आहे.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि राज्यातील सरकारचाही पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने शरद पवार पहिल्यापासूनच ठामपणे उभे आहेत. याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळातही शरद पवार सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं ऐकलं पाहिजे. कठोर भूमिका सोडून चर्चेतून तिढा सोडवला पाहिजे, असे मत याआधीच शरद पवार यांनी मांडलेले आहे. आता तर पवार थेट आंदोलनातच उतरत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.