मुंबई - सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि करीअर घडवण्याच्या दृष्टीने व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना खासदार शरद पवार यांनी केल्या आहेत. यशवंतराव चव्हान सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी या सुचना केल्या. या बैठकी सामाजिक न्याय विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि अन्य स्वंयसेवी संस्थाच्या माध्यामातून ३ लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व हक्काचा रोजगार देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या विषयी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकी दरम्यान काही स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेल्या विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे सादरीकरण केले. सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती - जमातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण - प्रशिक्षणास लागणारी प्रत्येक मदत करण्यास कटिबद्ध आहे. या शिवाय एवढ्यावर न थांबता प्रत्येक विद्यार्थी स्वयंभू व करिअरच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा, बेरोजगारीला आळा घालता यावा यासाठी बार्टी व संस्थांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात येत आहेत. ३ लाख विद्यार्थ्यांना या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. असे या बैठकीनंतर बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले.