मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयच्या स्वाधीन केला असल्याने त्यासाठी महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशीत पूर्ण सहकार्य करेल, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे सीबीआयच्या एकूणच तपास यंत्रणेवर बोट ठेवत, ज्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २०१४ पासून सुरू असलेल्या हत्या प्रकरणाचे सीबीआयने अद्याप निराकरण केले नाही, तसे या प्रकरणात होणार नाही', असे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले आहे.
'मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही',
पवार यांनी दुसऱ्या का ट्विटमध्ये 'सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास 'सीबीआय'च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल', असे सांगत महाराष्ट्र सरकार या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिल्यानंतर पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या प्रकरणाचा निकाल लागताच यासाठी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले. यामुळे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी पसरली होती. पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटरचा आधार घेत विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला. त्यासोबतच मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे शरद पवार यांनी आज सावधपणे भूमिका घेत दोन ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह प्रकरणाचे तपासकार्य आणि त्याची परिणती ही 2014पासून सीबीआयकडे सुरू असलेल्या प्रकरणाप्रमाणे होणार नाही, असे खोचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.