मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, तसेच महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख, तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या आठवड्यात तीन दिवसांत शरद पवार दोनदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले. त्यामुळे, ठाकरे आणि पवार यांमध्ये शिजतंय काय? अशा चर्चेला जोरदार उधाण आले आहे.
हेही वाचा -शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; पिक आणि फळ विम्यासाठी राज्य सरकारचा पाठपुरावा
वर्षा बंगला चर्चेचे केंद्रस्थान
शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर फेऱ्या वाढल्या आहेत. मागील भेटीत दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. सध्या राज्यात क्रुझ पार्टी प्रकरण गाजत आहे. एकीकडे अभिनेता शाहरूख खान आपल्या मुलाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. पण, शरद पवारांनी या बाबत अजून तरी बघ्याची भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा विषय शरद पवार यांच्याकडे चर्चिला असल्याचे समजते. मुंबईसह होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोर्चेबांधणी सुरू झाली असली तरी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे, अशा परिस्थितीत राजकीय समीकरणे कशी बांधता येतील, या विषयावर चर्चा झाली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकारने लवकरच त्यांचे पैसे विमा कंपनीकडे जमा करावे यासाठी सुद्धा चर्चा झाली. राज्यात लसीकरण मोठ्याप्रमाणात झाल्याने कोरोना महामारीचा प्रभाव आता कमी झाला आहे. अशात व्यापार, उद्योग, जनतेचे दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा शरद पवार व मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली.
केंद्रीय तपास यंत्रणा महत्त्वाचा मुद्दा
केंद्रिय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे सक्रिय झाल्या आहेत. आतातर पवार कुटुंबीयांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. या बाबत पवार पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण देत असले तरी याचा प्रतिकार कसा करायचा, यासर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पवार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले असावेत, असा कयास राजकीय विश्लेषकांचा आहे.
हेही वाचा -Mumbai Fire : मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत तब्बल 1568 आगीच्या दुर्घटना!