मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे बुधवारी दिल्लीमध्ये पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घेणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की ममता बॅनर्जी यांनी मागील आठवड्यात फोन केला होता. त्यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती दिली होती. तसेच मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. उद्या, दिल्लीत आमची भेट होऊ शकते, असे मला वाटते. केंद्र सरकार पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर विचारले असताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले, की त्याबाबत बोलण्याची ही वेळ आणि स्थान नाही. आम्ही हा प्रश्न योग्य ठिकाणी उपस्थित करू.