मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असून तो अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणार्या होतकरू तरुण तरुणींना तर शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सहाय्याने काम करणाऱ्या शिक्षकांना शरद पवार इनस्पायर फेलोशिप दिली जाणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
'तरुण वर्गाला फायदा होईल' -
शरद पवार गेली ६० वर्षाहून अधिक काळ देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहेत. शेती क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आजही जनतेला फायदा होत आहे. याशिवाय औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक कल्याण, शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण इत्यादी अशा विविध क्षेत्रात पवार यांनी केलेले कार्य क्रांतिकारी असून पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच पवार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रांचा वसा कायम ठेवला. पवारसाहेबांच्या नावाने फेलोशिप जाहीर करताना आनंद होत असून याचा विकासाची जाण असणार्या आणि समाजासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची धमक असणाऱ्या तरुण तरुणींना नक्कीच फायदा होईल, असेही सुळे म्हणाल्या.
'12 डिसेंबरला सन्मान' -
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने 'शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर', 'शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप' (शरदचंद्र पवार साहित्य पाठयवृत्ती) आणि 'शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन' या तीन फेलोशिप दिल्या जाणार आहेत. पैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील फेलोशिपचा कार्यक्रम ८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून निवडलेल्या फेलोची घोषणा १ डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी निवडलेल्या फेलोंना ती फेलोशिप सन्मानपूर्वक दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.