मुंबई - " 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय' या वाक्यांमुळे प्रसिद्ध झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शाहजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil ) यांच्या मंत्रालयाजवळील आमदार निवासातील खोलीचा स्लॅब रात्रीच्या सुमारास कोसळला. ( Shahaji Bapu Patil Room Slab Collapse ) या दुर्घटनेतून शहाजी बापू पाटील हे थोडक्यात बचावले आहेत.
थोडक्यात बचावले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्यासोबत असलेले आमदार शहाजी बापू पाटील काल (बुधवारी) रात्री आपले कामकाज संपवून मुंबईमधील मंत्रालयाजवळ असलेल्या आकाशवाणी आमदार निवास येथे आले. आपल्या खोलीचा त्यांनी दरवाजा उघडताच खोलीचे छप्पर खाली कोसळले. हे छप्पर शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळले आहे. या दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले. त्यानंतर आमदार निवासात रात्री दुसऱ्या खोलीचा बंदोबस्त करावा लागला. यात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.
यामुळे झाले प्रसिद्ध -शिवसेनेचे मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. शिंदे यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटी आणि गोवा येथे ११ दिवस होते. या कालावधीत गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये असलेले शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय' या वाक्याचा उच्चार केला होता. हा संवाद सोशल मीडिया आणि मीडियामध्ये व्हायरल झाल्यावर हे वाक्य प्रसिद्ध झाले आहे. या वाक्यावरून गाणेही बनवण्यात आले आहे.