मुंबई : गॅंगस्टर सुरेश पुजारी आणि प्रसाद पुजारी यांच्या टोळी मधील सात हस्तकांनी चेंबूर येथील व्यवसायिकाकडून 10 कोटी रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्याने व्यवसायिकाच्या हत्येचा कट रचने आणि खंडणी मागितल्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मोका न्यायालयाने या आरोपींना 10 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायालयाने 15 लाखांचा दंड ठोठावला आहे.
मागण्या पूर्ण न केल्याने खूनाचा कट रचला : न्यायालयाने निकाल देताना असे म्हटले आहे की आरोपीने वॉण्टेड आरोपींसोबत मिळून मरणाच्या भीतीने व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता. तसेच आरोपींनी त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने त्यांचा खून करण्याचा कटही रचला होता हे सिद्ध झाले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक: सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी प्रकाश बिचल, मुबशीर सय्यद, गौतम मेहता, छोटेलाल जैस्वार, कृष्णा खंडागळे, नरेश शेट्टी आणि रवी गायकवाड या सर्व आरोपींना दहा वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली होती त्यापैकी एक आरोपी माफीचा साक्षीदार झाल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. या प्रकरणात न्यायालयासमोर 33 साक्षीदार तपासण्यात आले होते.
दोन दिवसांत 10 कोटी रुपयांची मागणी : तक्रारीनुसार पुजारी यांनी 14 सप्टेंबर 2015 रोजी चेंबूर येथील फायनान्स ब्रोकरला फोन करून दोन दिवसांत 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. पुन्हा 16 सप्टेंबर 2015 आणि 18 सप्टेंबर 2015 रोजी पुजारीने त्याला फोन करून मागणी केली. तिसऱ्या कॉलनंतर तक्रारदाराने पोलिसांशी संपर्क साधला आणि धमकीच्या कॉलची तक्रार दिली होती. पोलिसांनी नंतर कॉल रेकॉर्ड मिळवले आणि महिनाभरानंतर बिचल आणि सय्यदला अटक केली होती. आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी इतर आरोपींना गुन्ह्यात केलेल्या भूमिकेसाठी अटक केली. बिचल आणि मेहता हे पुजारीच्या थेट संपर्कात होते. ते मुंबईतील सुरेश पुजारी टोळीच्या कारवाया पहात होते, असे सांगण्यात आले. सय्यद 2010 मध्ये तुरुंगात बिचलच्या संपर्कात आला आणि त्याच्यासोबत काम करू लागला तर जयस्वार हा बिचलचा बालपणीचा मित्र होता.
गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपासाठी दोषी: शेट्टी आणि गायकवाड यांनी जबाबानुसार पुजारी यांच्याकडे पैसे हस्तांतरित केल्याचा दावा फिर्यादीने केला. व्यावसायिकाने दबावाला बळी न पडल्याने टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता या कामासाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था केली होती असा दावा फिर्यादी पक्षाने केला होता. विशेष न्यायालयाने फिर्यादीचे पुरावे स्वीकारले आणि आठपैकी सात आरोपींना खंडणी व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपासाठी दोषी ठरवले आणि वस्तुस्थितीचा पूर्ण आणि खरा खुलासा करण्यासाठी मंजूरकर्त्याला माफीचा साक्षीदार झाल्याने माफी दिली.