महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईकरांसाठी गुड न्यूज.. ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज - सेरो सर्व्हे मुंबई

एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच, कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंट्समुळे देखील सरकारची, प्रशासनाची आणि सामान्य जनतेची चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर एक दिलासादायक वृत्त आले आहे, की मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

esero survey in mumbai
esero survey in mumbai

By

Published : Jun 28, 2021, 6:55 PM IST

Updated : Jun 28, 2021, 7:13 PM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मुंबई तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. ही समाधानकारक बाब असून यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण कमी प्रमाणात होऊ शकते, अशी शक्यता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली आहे. तसेच ज्यांना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.

कस्तुरबा रुग्णालयात सर्वेक्षण -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा आल्या. एक लाट ओसरली असून दुसरी लाट ओसरत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान किती लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या याची माहिती मिळवण्यासाठी महापालिकने सेरो सर्व्हे केला आहे. १ एप्रिल ते १५ जून दरम्यान पालिकेच्या २४ वार्डात लहान मुलांचे सॅम्पल गोळा करण्यात आले होते. त्यात एकूण २ हजार १७६ रक्त नमुने वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. यात महापालिकेच्या आपली चिकित्सा वैद्यकीय प्रयोगशाळांच्या विविध शाखा आणि नायर रुग्णालय यांच्या माध्यमातून १ हजार २८३ आणि खासगी २ वैद्यकीय प्रयोगशाळातून ८९३ रक्त नमुने संकलित करण्यात आले. या रक्त नमुन्यांची आवश्यक प्राथमिक चाचणी केल्यानंतर अँटीबॉडीज संदर्भातील चाचणी करण्यासाठी हे सर्व रक्त नमुने कस्तुरबा रुग्णालयातील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.

माहिती देताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त
५१.१८ टक्के बालकांमध्ये अँटीबॉडीज -

मुंबईतील ५१.१८ टक्के बालकांमध्ये अँटीबॉडीज आढळली आहेत. त्यापैकी, महानगरपालिकेच्या प्रयोगशाळातील ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळातील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. वय वर्षे १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. वयोगटानुसार विचार करता वयवर्षे १ ते ४ गटामध्ये ५१.०४ टक्के, ५ ते ९ वयोगटामध्ये ४७.३३ टक्के, १० ते १४ वयोगटामध्ये ५३.४३ टक्के, १५ ते १८ वयोगटामध्ये ५१.३९ टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. वय १ वर्ष ते १८ पेक्षा कमी या संपूर्ण वयोगटाचा विचार केल्यास ही सरासरी ५१.१८ टक्के इतकी होते. विशेष म्हणजे यापूर्वी मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये वयवर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटातील ३९.०४ टक्के इतक्या मुलांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज वाढल्या आहेत. याचा अर्थ असा आहे कि, दुसऱ्या लाटेदरम्यान १८ वर्षापेक्षा कमी वयातील मुले आणि बालके कोरोना विषाणूच्या सानिध्यात आली आहेत, असे काकाणी यांनी संगितले.

दोन डोस घेतलेल्याना कमी भीती -

मुंबईमध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान ३ लाख ९६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये लसीचा एक डोस घेतलेल्या १० हजार ५०० लोकांना म्हणजेच २.६६ टक्के तर दोन्ही डोस घेतलेल्या २६ लोकांना म्हणजेच ०.०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ ज्यांनी कोरोना विरोधातील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे, असे काकाणी म्हणाले.

Last Updated : Jun 28, 2021, 7:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details