मुंबई- कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या अनेक नागरिकांना वर्सोव्यातील शेल्टर होमममध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी आपल्याला चांगले जेवण मिळत नसल्याची खंत येथे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे येथे असलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील तरुणांच्या खिशातील पैसेही संपले असल्याने आपले पुढे काय होईल ही चिंता त्यांना सतावत आहे. वर्सोव्यातील शेल्टर होममध्ये राज्यासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, केरळ, ओरिसा, मध्य प्रदेश आदी विविध राज्यातील तब्बल 218 जणांना आधार मिळाला आहे. यासाठी विविध सेवभावी संस्था आणि सरकारची मदत येथे दिली जात आहे.
ईटीव्ही भारत विशेष:आमची जेवणाची तारांबळ होतेय.. वर्सोव्यातील शेल्टर होममधील ज्येष्ठ नागरिकांची खंत - Varsova
शेल्टर होममधील काही ज्येष्ठ नागरिकानी आपल्याला जे जेवण दिले जाते तेही शिळे असते हे त्यामुळे आम्ही प्रचंड वैतागलो असल्याचे असल्याचे सांगितले. काही तरुणांनी मात्र जेवण चांगले मिळत असल्याचे सांगितले.

या शेल्टर होममध्ये अलीकडे काही दिवसांपासून बाहेरून एका संस्थेच्या माध्यमातून जेवण तयार करून येथे आणले जाते. त्यापूर्वी ते पॉकेट तयार करून दिले जात होते. ते जेवण चांगले होते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात येथे व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी जेवण चांगले असल्याचा दावा केला. आपल्याकडे दोन वेळेचे चांगले जेवण, एक वेळ नाष्टा, चहा दिला जातोय, प्रत्येकाच्या आरोग्याची आम्ही काळजी घेतोय, अशी माहिती येथे सर्व व्यवस्था पाहणारे उपनियंत्रक विजय जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांची आम्ही अधिक काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्सोवा मेट्रो स्थानकाला लागून असलेल्या नागरी संरक्षण दलाच्या मैदानावर एक मोठे टेंट लावून लॉकडाऊनमध्ये मुंबईत विविध ठिकाणी अडकलेल्या 218 नागरिकांना आणून ठेवण्यात आले आहे. यात 13 महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर उर्वरितामध्ये तरुणांसह मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत. मोलमजुरीसाठी मुंबईत आलेल्या परंतु कोणताही आधार नसलेल्या राज्यातील सांगली, सातारा, औरंगाबाद, जळगाव येथील अनेक तरुण येथे आहेत. प्रत्येकजण लॉकडाऊन कधी संपेल आणि आपण आपल्या गावी कधी जाऊ याची वाट पाहत आहेत. लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर बरेच दिवस रस्त्यावर दिवस काढून खिशात होते ते पैसेही संपले असल्याने काहींना आपले काय होईल ही चिंता सतावत आहे.