महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावीकरांचा कोरोनावर विजय; दुसरी लाटही थोपवली

मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजना आणि धारावीकरांनी केलेला निश्चय यामुळे धारावीमधील कोरोना दुसऱ्यांदा आटोक्यात आला आहे.

dharavi corona
संग्रहित फोटो

By

Published : Jun 17, 2021, 7:32 PM IST

मुंबई -मुंबईतील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी. या झोपडपट्टीत लोक दाटीवाटीने राहतात. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. मात्र महापालिकेने केलेल्या उपाययोजना आणि धारावीकरांनी केलेला निश्चय यामुळे धारावीमधील कोरोना दुसऱ्यांदा आटोक्यात आला आहे. इतकेच नव्हे तर धारावीत गेल्या वर्षभरात आठ वेळा तर दुसऱ्या लाटे दरम्यान दोन वेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच धारावीमध्ये फक्त सहा सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलची चर्चा देशभरात करण्यात आली. तसेच हे मॉडेल अनेकठिकाणी राबवण्यात आले आहे.

  • धारावीत ६ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात ७ ते ११ हजारावर गेली होती. धारावीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत ८ मार्चला १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. ११ एप्रिलला धारावीत ७६ नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या घटू लागली आहे त्याचप्रमाणे धारावीतील रुग्णसंख्याही घटू लागली आहे. मे महिन्यात १ मे ला २८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात घट होत आली आहे. १०, ११, १३, २२ मे ला दिवसाला ९ रुग्णांची नोंद झाली. २५ मे ला ७ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात धारावीत ० ते ३ रुग्ण आढळून आले आहेत. आज १७ जून रोजी १ रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या ६८६३ वर गेली आहे. त्यापैकी ६४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • धारावी आठव्यांदा शून्यावर -

मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाने हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै - ऑगस्टनंतर धारावीत रुग्ण संख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. २४ डिसेंबर २०२०मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ला दुसर्‍यांदा, २६ जानेवारीला तिसर्‍यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मुंबई फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान धारावीतही रुग्णसंख्या वाढली होती. मात्र धारावीत १४ आणि १५ जूनला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. धारावीत आतापर्यंत आठव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

  • धारावी मॉडेल -

१ एप्रिल २०२० ला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरू केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details