मुंबई -आजपासून ( २७ जानेवारी २०२१) राज्यातील इ. ५ वी ते ८ वीच्या शाळा पूर्ण काळजी व खबरदारी घेऊन सुरू होत आहेत. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून 'चला मुलांनो चला शाळेकडे चला' या आशयाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ ट्विट करून विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. मात्र मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप काहीच निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून घेण्यात आला नसल्याने पालक व संस्थाचालक, मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.
शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड राज्यातील प्रमुख शहरे व महानगरातील शाळांबाबतचा आढावा -
पुणे -
केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करत काही दिवसापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मागील आठवड्यातील आकडेवारीनुसार 76 टक्के विद्यार्थी या वर्गाला हजेरी लावत आहेत. आजपासून राज्यभरातील पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर टप्प्या-टप्प्याने इतरही वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. पूर्णपणे काळजी घेऊन आणि पूर्वतयारी करून हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पुण्यातील काही शाळांना भेटी दिल्या आणि नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्य सरकारने जरी 27 जानेवारी रोजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, शाळांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळावा म्हणून पुणे महापालिका हद्दीतील हे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने जरी 27 जानेवारी रोजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, शाळांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळावा म्हणून पुणे महापालिका हद्दीतील हे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद -
गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आवाज पुन्हा घुमला. औरंगाबाद सहावी ते आठवी वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहेत. याआधी 23 नोव्हेंबर रोजी नवी येथे बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु इतर वर्गांना परवानगी देण्यात आली नव्हती. प्राथमिक शाळा सुरू करण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाने आदेश दिल्यानंतर आजपासून राज्यभर पाचवी ते आठवी शाळा सुरू झाल्या असल्या तरी औरंगाबाद मात्र सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशभरात कोरोनाचा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मार्च 2020 पासून जाणवू लागला. संसर्ग वाढू नये यासाठी सर्व प्रथम महानगरपालिका हद्दीतील शाळा बंद करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र 23 मार्च पासून सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
नाशिक -
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने 9 वी ते 12 वी पाठोपाठ आज 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेकडूनही विद्यार्थ्यांची काळजी घेत विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आज पहिल्या दिवशी 5 वी ते 8 वी च्या वर्गात केवळ 25 टक्के उपस्थिती दिसून आली. पालकांनी विद्यार्थ्यांना निर्धास्त शाळेत पाठवावे, असं आवाहन शाळा प्रशासनाने केलं आहे.गेल्या महिन्यात 9 वी ते 12 वी शाळा सुरू केल्यानंतर आजपासून 5 वी ते 8 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यानुसार आजपासून शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी केवळ 2 महिन्यासाठी उगाच शाळा सुरू केल्या असून या निर्णयाचा फेरविचार शासनाने करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
संमती पत्र देण्यास असमर्थता.!
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र यासोबतच विद्यार्थ्यांनी पालकांना शाळेत पाठवताना संमती पत्र देण्याचे बंधनकारक आहे यामुळे अनेक पालक नाराज झाले असुन अनेकांनी संमती पत्र देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळांची खणाणली घंटा -
जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळांची घंटा आज खणाणली. शाळा सुरू करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी उपाययोजना केल्याचे पाहायला मिळाले. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सुमारे ७० टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यात काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात एकूण २० हजार ५५४ शिक्षक आहेत. त्यापैकी १३ हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.
कोल्हापुरातील शाळा पुन्हा गजबजल्या -
तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आजपासून राज्यातील शाळा पुन्हा एकदा गजबजल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरमधील 5 वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. सरकारी शाळांंसोबत काही खासगी शाळेत सुद्धा सकाळपासूनच मुलं शाळेच्या आवारात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग केल्यानंतर सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येत असून पालकांचे संमतीपत्र सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 10 महिने शाळा बंद होत्या. आता पुन्हा सुरू जरी झाल्या असल्या तरी शाळा प्रशासनाने पालकांनी आपापल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावे, असे शाळेकडून संमतीपत्र लिहून घेतले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1 हजार 54 इतक्या शाळा आहेत. त्यामध्ये 12 हजार 629 इतके शिक्षक आहेत. आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
अमरावतीतही १० महिन्यांनतर वाजली घंटा -
कोरोनामुळे तब्बल 10 महिन्यापासून शाळा बंद होत्या तर आता कोरोना रुग्ण संख्या आता आटोक्यात येत असल्याने आता हळूहळू टप्प्याृ ट शाळा सुरू होत आहे,तर अमरावती जिल्हात पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकांनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसुन आला, शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं व पालकांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. 10 महिन्यापासून विद्यार्थी घरातल्या घरात असल्याने व आजपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चैतन्य दिसत होते. त्यामुळे पालकांनी पण आनंद व्यक्त केला आहे, राज्य शासनाने टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू केल्या आहे. प्रत्येक शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेण्यात आले तर आज पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
नागपूरमधील ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू -
नागपुरात कोविड काळात बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु झाल्या. नागपूर ग्रामीणमध्ये 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तब्बल 10 महिन्यानंतर 1,668 शाळांमध्ये वर्ग सुरु होणार आहेत.
नागपूर ग्रामीणमध्ये 5 वी ते ८ पर्यंतचे 1 लाख 48 हजार विद्यार्थी आहेत. पालकांचं संमतीपत्र घेऊनच शाळा सुरु होणार आहेत. तसंच शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आलं आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोविडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. शहरी भागातील शाळा आज सुरू झाल्या नाहीत.
गोंदियात ४२२ शाळा आज झाल्या सुरू -
गोंदिया - जिल्ह्यात आज दुसऱ्या टप्प्यात वर्ग ५ वी ते ८ वी पर्यंतच्या ४२२ शाळा सुरु झाल्या असून ५० % विद्यार्थ्यांनी आज पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली. जिल्ह्यातील सरकारी व खासगी शाळा आजपासून सुरू झाल्या. तब्बल १० महिन्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू झाल्या असून मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागताच राज्यातील सर्व खासगी तसेच शासकीय शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पहिल्या टप्यात वर्ग ९ ते १२ पर्यतच्या शाळा तसेच महाविद्यालय सुरु करण्यात आले होते. मात्र आज वर्ग ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरु झाल्या.