महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार २ लाखांचे अनुदान

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टीमार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे.

dhananjay munde latest news
दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार २ लाखांचे अनुदान

By

Published : Jun 24, 2021, 7:06 PM IST

मुंबई- अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टीमार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

बार्टीच्या बैठकी घेण्यात आला निर्णय -

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना एमएच-सीईटी (MH-CET), जेईई (JEE), नीट (NEET) यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या ३० व्या नियामक मंडळाची बैठक २१ जून रोजी पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालकांच्या उत्पन्नाचा व जातीचा दाखला अनिवार्य -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना पालकांच्या उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बार्टीची -

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा प्रस्ताव कार्यकारणीत पारित

ABOUT THE AUTHOR

...view details