संजय राऊत : पत्रकार ते राष्ट्रीय राजकारणाचा चेहरा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपाला एकहाती शिंगावर घेण्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. भाजपाला सतत त्यांच्या वचनाची आठवण संजय राऊत करून देत राहिले. महाविकास आघाडी सरकार स्थापन होईपर्यंत संजय राऊत यांनी विशेष मेहनत घेतली. सध्या त्यांच्या शब्दाला शिवसेनेत मोठे महत्व आहे. शिवसेनेत एक महत्त्वाचे नेते असलेले संजय राऊत यांचा नेमका राजकीय प्रवास कसा राहीला आहे. याचा ईटीव्ही मराठीने आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई - महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा प्रकारची आघाडी राज्यात कधी अस्तित्वात येईल, अशी कोणीही अपेक्षाही केली नव्हती. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासाठी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेनेने केला आणि त्यातूनच महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विशेष मेहनत घेतली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या तख्तावर बसला. आघाडी सरकार स्थापनेनंतर राज्यातील राऊत यांचे वजन वाढले आहे. मात्र, राऊत यांना राष्ट्रीय राजकारण खुणावत आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे, यानिमित्त ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
संजय राऊत हे नाव फक्त राज्यात नाही तर गेल्या दोन वर्षात देशातील प्रत्येक भागात पोहचले आहे. आपल्या विशेष शैलीसाठी राऊत ओळखले जातात. राष्ट्रीय राजकारणात भाजपवर टीका करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते आहेत. त्यात राऊत यांचे नाव मुख्य आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात आल्याने राऊत यांच्या प्रत्येक शब्द निखाऱ्यासारखा असतो. जो विरोधकांना घायाळ करतो. या सडेतोड शैलीच्या जोरावर राऊत यांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडले आहे. सत्ता स्थापनेनंतर राऊत यांचे राष्ट्रीय पातळीवरसुद्धा वजन वाढले आहे. थेट राहुल गांधी, शरद पवारसुद्धा संजय राऊत यांची स्तुती करताना दिसतात. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता राऊत यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. शिवसेना बाकीच्या राज्यात देखील वाढावी, यासाठी देखील राऊत अधिक प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी शिवसेनेच्या चेहरामोहरा बदलण्याचे काम देखील सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकीत शिवसेनेने राज्याबाहेर आपले खाते देखील खोलले आहे. या विजयाचे श्रेय देखील राऊत यांनाच जाते. टप्प्याटप्प्याने राऊत कार्यक्रम करत सुटले आहेत. सामना पत्रकार ते संपादक, संपादक ते खासदार खासदार ते राष्ट्रीय नेतृत्व असा प्रवास राऊत यांनी केला आहे. त्यांच्या अचूक शब्दफेकीवर तरुणाई देखील फिदा आहे.
खरंतर पत्रकारितेपासून झालेला त्यांचा प्रवास डोळे दिपावणारा आहे. मोजक्या मराठी पत्रकारांनी अशा प्रकारचा टप्पा गाठला आहे. संजय राऊतांनी 'सामना' वृत्तपत्र चर्चेत कसं राहील याचीही काळजी घेतली. आज इतर मुखपत्र आणि वृत्तपत्र या पेक्षाही जास्त चर्चा सामनाची होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया सामनाची दखल घेते. मराठी न येणारे हिंदीभाषक नेतेही तुम्ही आमच्या विरोधात का लिहिता, असं संजय राऊत यांना विचारत असतात.
23 जानेवारी 2017 ला वरळीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढू, असा ठराव मांडण्यात आला होता. हा ठराव संजय राऊत यांनीच मांडला होता. पण असं झालं नाही. पण नंतर राजकीय परिस्थिती पाहून युती करण्यात आली. मात्र, 2019 मध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर राऊत यांचे वजन शिवसेनेत वाढले. आज त्यांच्या शब्दाला शिवसेनेत विशेष महत्त्व आहे. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त ईटीव्ही भारतकडून त्यांना शुभेच्छा.