मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल मंगळवार (दि.5 एप्रिल)रोजी मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यानंतर आज मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर आयएनएस विक्रांत संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. ( Raut's Allegations Against Kirit Somaiya ) आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयामध्ये पोहचले नसल्याची माहिती राऊत यांनी माध्यमांसमोर उघड केली आहे. ही माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, सोमैया यांचा हा देशद्रोहीपणा आहे. त्याचा केंद्रीय संस्थांनी तपास करावा असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
किरीट सोमय्या अडचणीत -शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्याकरता जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयामध्ये पोहोचले नसल्याची बाब माहिती अधिकारांअंतर्गत समोर आलेली आहे. आरटीआय कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याविषयी ही माहिती मागवली होती.
राज्यपाल कार्यालयांमध्ये असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. ही माहिती मागील महिन्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सोमैया हे सीए असल्याने असा पैसा कसा पचवायचा याची माहिती त्यांना असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत.