मुंबई - महापालिकेच्या खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीचा बोनस मिळावा, आदी मागण्यांसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही सदिच्छा भेट घेतली.
हेही वाचा -विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तत्काळ मदतीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी निर्देश द्यावेत - मुख्यमंत्री
मुंबई महानगरपालिका खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ‘जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेने’च्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. पालिकेचे शिक्षक व राज्य शासन खासगी शाळा शिक्षक-कर्मचार्यांना मिळणार्या सुविधांच्या धर्तीवर पालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांनाही सुविधा मिळाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये सातव्या वेतन आयोगाबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत याबाबत अंमलबजाणी सुरू होणार असल्याची माहिती आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिली.