मुंबई - मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील शिवसेनेला गळती लागली आहे. शिंदे गटाकडून आता थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दै. सामना या मुखपत्राला वादळी मुलाखत देणार ( Uddhav Thackeray Interview ) आहेत. येत्या २६ आणि २७ जुलैला ही मुलाखत प्रकाशित होणार असल्याची माहिती सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेनेमधील बंडाळीनंतर सामनातील पहिलीच मुलाखत - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. हिंदूत्वाचा मुद्दा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यामुळे काम करण्यात अडचणी येत होत्या, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. खासदारांनीही शिवसेनेच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शिंदे गटात सामील झाले. आता सत्तापालट झाल्यानंतरही बंडखोर आमदारांनी ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे या संपूर्ण घडामोडींवर उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहेत. संजय राऊत यांनी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. शिवसेनेचे मुखपृष्ठ दै. सामनाला रोखठोख मुलाखत ठाकरेंनी दिली आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर `सामना`मधील ही पहिलीच मुलाखत असणार आहे. त्यामुळे या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.