महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विरोधीपक्षनेते हे 'मोठे नेते', म्हणूनच दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही -संजय राऊत

आपले विरोधीपक्षनेते हे खूप मोठे नेते आहेत. कदाचित ते मोदींपेक्षाही मोठे नेते असावेत. त्यांची उंची मोठेपणाची सह्याद्री पेक्षाही मोठी आहे. म्हणूनच ते पुन्हा मुख्यमंत्री होवू शकले नाहीत असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Mar 25, 2021, 11:22 AM IST

Updated : Mar 25, 2021, 12:49 PM IST

दिल्ली- आपले विरोधीपक्षनेते हे खूप मोठे नेते आहेत. कदाचित ते मोदींपेक्षाही मोठे नेते असावेत. त्यांची उंची मोठेपणाची सह्याद्री पेक्षाही मोठी आहे. म्हणूनच ते पुन्हा मुख्यमंत्री होवू शकले नाहीत असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राजभवनात बुधवारी फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत हे फार मोठे नेते नाहीत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही असे फडणवीस म्हणाले होते. त्या पार्श्वभूमिवर राऊत यांनी गुरूवारी फडणवीसांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली टीका...

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी केली जाणार आहे असे राऊत यांनी सांगितले. अशा स्थितीत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंग यांच्या पत्रात अनेक संशयास्पद गोष्टी आहेत. शिवाय हे पत्र त्यांनीच लिहीले आहे की कुणी दुसऱ्याने लिहून दिले आहे या बाबतही शंका असल्याचे ते म्हणाले.

विरोधीपक्षनेते म्हणतात चौकशी नको फाशी द्या

सिंग यांच्या पत्रातील आरोपांच्या चौकशीसाठी महाविकास आघाडीतील सर्वच जण तयार आहेत. पण विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात चौकशी नको थेट फाशी द्या. असे असेल तर त्यांच्या काळात किती जणांना फाशी देण्यात आली होती याची माहिती द्यावी असे राऊत म्हणाले. त्यातुन परंपरा काय आहे हेही लक्षात येईल असे ते म्हणाले. विरोधीपक्षाने सतत राजीनाम्याची मागणी करू नये असा सल्ला ही त्यांनी दिला. तसे केल्यास पक्षाचेच हसे होते. शिवाय लोकं तुम्हाला मुर्खात काढतात हेही सांगायला ते विसरले नाहीत. विरोधीपक्षनेत्याची प्रतिष्ठा जाईल असे वर्तन करू नका. परिस्थितीचे भान ठेवावे असा सल्ला ही त्यांनी फडणवीसांना दिला.

राज्यपालांना १२ आमदारांवर पीएचडी करायची आहे का?

यावेळी त्यांनी राज्यपालांवरही टीका करण्याची संधी सोडली नाही. गेले सहा महिने राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे सरकारने दिली आहेत. मात्र त्यावर राज्यपाल निर्णय का घेत नाहीत असा प्रश्न त्यांनी केला. ते अभ्यास करत आहेत हे ठीक आहे पण त्यावरती पीएचडी करणार आहेत का असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. शिवाय राज्यपालांच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली. राज्यपालांना महाविकास आघाडीचे नेते भेटणार होते. त्या बाबत राऊतांना विचारले असता राज्यपाल खुप बिझी असतात. त्यामुळे त्यांना वेळ आहे की नाही हे समजत नाही. मात्र भाजपाचे नेते हे राजभवनावर सतत असतात असेही त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी जरा १२ आमदारांच्या नियुक्तीचे काय झाले याची विचारणा राज्यपालांकडे करावी असे सुचवले.

युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे

युपीए सध्या विकलांग अवस्थेत आहे. अशा वेळी शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करावे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. भाजप विरोधातील सर्वच प्रादेशिक पक्षांची तशी मागणी असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसच्याही काही नेत्यांना असे वाटते. शिवाय युपीए मजबूत व्हावी ही काँग्रेसची भूमिका आहे. जर पवार अध्यक्ष झाले तर युपीए नक्कीच मजबूत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे; हे देशासाठी घातक!

हेही वाचा -'मीच ठेवले होते धमकीचे पत्र'; सचिन वाझेंची एनआयएकडे कबुली

Last Updated : Mar 25, 2021, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details