मुंबई - जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रायगड जिल्ह्यातील तळीये ( Taliye ) गाव बाधित झाले. या गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar Cabinet Minister of Other backward class welfare, disaster management, relief & rehabilitation ) यांनी दिली.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी, केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर ही गावे बाधीत झाली होती. तसेच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरीकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याच अनुषंगाने या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाकरीता भुसंपादन तसेच नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याअंतर्गत महाड तालुक्यातील तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये भुसंपादन करण्यासाठी २ कोटी ९२ लाख १७ हजार ७६१ रूपये, तर केवनाळे मध्ये भुसंपादन करण्यासाठी ६४ लाख २६ हजार १४८ रूपये, पोलादपूर तालुक्यातील साखर (सुतारवाडी) साठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रूपये असे एकूण भुसंपादनासाठी ३ कोटी ९४ लाख ८५ हजार ६९५ रूपये तर महाड तालुक्यातील तळीये तर कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रूपये असे एकूण १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. तसेच याबाबत शासन निर्देश निर्गमित केल्याचे ते म्हणाले.
तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता २५ लाख
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी, केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील साखर (सुतारवाडी) या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाच्या प्रस्तावासही शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनर चौथरा तयार करणे, नळ पाणी पुरवठा योजना करणे तसेच रस्ते व ड्रेनेज लाईन तयार करणे इत्यादी कामांसाठी आवश्यक ५५ लाख ५८ हजार ३८४ रूपये इतक्या निधीपैकी ५०% म्हणजे २५ लाख ७९ हजार १९२ इतका निधी या शासन निर्णयाद्वारे मंजूर केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
तळीये गावाच्या पुनर्वसनाकरिता १३ कोटी रुपये निधी मंजूर - विजय वडेट्टीवार - तळीये
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रायगड जिल्ह्यातील तळीये गाव बाधित झाले. या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
तळीये गावाच्या पुनर्वसनाकरिता १३ कोटी रुपये निधी मंजूर