मुंबई -बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ( Sushant Rajput Case ) याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी केली जात होती. अभिनेता सुशांत सिंगला रिया चक्रवर्ती ( Riya Chakraborty ) आणि तिचा भाऊ यांनी अनेक वेळा गांजा विकत घेऊन, सुशांत सिंगला दिला असल्याची एनसीबीने एनडीपीएस न्यायालयात दिलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 27 जुलै रोजी होणार आहे.
अंमली पदार्थांशी संबंधित बाजू समोर -बॉलीवूड अभिनेता सुशांतसिह राजपूतने 14 जून 2020 रोजी घरात आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थांशी संबंधित बाजू समोर आली, आणि एनसीबीने चित्रपट, टिव्ही वाहिन्यांशी संबंधित लोकांशी चौकशीला सुरूवात केली. सुशांतची मैत्रीण रिया आणि तिचा भाऊ शौविकला अन्य ड्रग्स पेडलर्ससोबत अटक करण्यात आली. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर आहेत. एनसीबीने मागील महिन्यात या प्रकरणाशी संबंधित 35 आरोपी विरोधात विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपांचा मसुदा दाखल केला होता. तो उपलब्ध करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांचे अवैधपणे विक्री केली होती -मसुद्यातील आरोपांनुसार सर्व आरोपींनी मार्च ते डिसेंबर 2020 या कालावधी दरम्यान उच्चभ्रू समाज आणि बॉलीवूडमध्ये ड्रग्स खरेदी, विक्री आणि वितरण करण्याचा कट रचला होता. आरोपींनी अमली पदार्थांच्या तस्करीला वित्तपुरवठाही करून गांजा, चरस, कोकेन आणि अन्य अंमली पदार्थांचे अवैधपणे विक्री केली होती. म्हणूनच सर्व आरोपींवर कलम 27 आणि 27अ, 28, 29 यांसारख्या एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
अमली पदार्थांचे पैसेही दिले असल्याचे एनसीबीत नमूद - तसेच रिया चक्रवर्तीने या प्रकरणातील आरोपी आणि ड्रग्स पेडलर्स सॅम्युअल मिरांडा, शौविक, दीपेश सावंतसह अन्य पडलर्सकडून अनेकदा गांजा सुशांतला दिला आहे. शौविक आणि सुशांतच्या सांगण्यावरून तिने मार्च आणि सप्टेंबर 2020 पर्यंतचे अमली पदार्थांचे पैसेही दिले असल्याचे एनसीबीने नमूद केले आहे. रियाचा भाऊ शौविक अमली पदार्थ तस्करांच्या नियमित संपर्कात होता. तो त्यांच्याकडून गांजा आणि चरसची ऑर्डर घेत असत. पुढे सुशांतकडे सुपूर्द करत असल्याचे एनसीबीने आरोपींच्या मसुद्यात म्हटले आहे. '