मुंबई -राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.9 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेच मलिक यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये मलिक यांनी आपल्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाला उत्तर देताना, हा विषय फडणवीस यांनी सुरू केला आहेच तर आता मी हायड्रोजन बॉम्ब फोडतो म्हणत फडणवीस यांचे कुणाशी संबंध आहेत हे पत्रकार परिषदेत सांगणार आहे असे जाहीर केले होते. त्यावर आज मलिक यांनी फडणवीसांच्या काळात गुंडाना शासकीय पदांवर बसवले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अंडरवर्ल्डचे लोक कसे, यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत.
हैदर आझम याला मौलाना आझाद बोर्डाचा अध्यक्ष बनवले
फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळात गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना शासकीय पदावर बसवले गेले. यामध्ये मुन्ना यादवला फडणवीसांनी मंडळाचे अध्यक्ष केले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, हैदर आझम याला मौलाना आझाद बोर्डाचा अध्यक्ष बनवले. तो बांगलादेशी लोकांना देशात आणतो. तेसेच त्याची बायको बांगलादेशी आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
रियाज भाटीच्या मदतीने फडणवीसांनी वसुलीचे रॅकेट चालवले
अंडरवर्ल्डची संबंध असलेल्या रियाज भाटीच्या मदतीने फडणवीसांनी वसुलीचे रॅकेट चालवले असे म्हणत तो फडणवीसांसोबत का असतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचे आणि फडणवीस यांचे काय कनेक्शन आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे असा सवाल मलिकांनी उपस्थित केला. याचबरोबर 14 कोटींच्या बनावट नोटांचे प्रकरण फडणवीस यांनी दाबण्याचे काम केले. ते कुणासाठी व का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाजला 2015 मध्ये अटक, मात्र आता फरार
बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाजला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, तो आता फरार आहे. तो कसा काय फरार झाला? त्याच्यावर कुणाचा वहदहस्त आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डच्या गुंडांकडून वसुली सुरु केली होती, असा आरोप मलिकांनी केला आहे. रियाज भाटी, हाजी अराफत यांच्याशी फडणवीसांचे काय संबंध आहेत, हे त्यांनी उघड करावे, असे मलिक यांनी म्हटले आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांनी आज रियाज भाटी, मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हैदर या प्रमुख चार व्यक्तींची नावे घेतली आहेत. यातील रियाज भाटीचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे. तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात व्हीआयपी पाससह कसा काय गेला होता, असाही सवाल त्यांनी केला आहे.