मुंबई -राणा दाम्पत्याच्या ( Ravi And Navneet Rana ) जामीन अर्जावर आज युक्तिवाद ( Argument In Rana Bail Petition Hearing ) पूर्ण झाला असून सोमवारी 2 मे ( Rana Bail Application Result ) रोजी न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे आणखी 2 दिवस राणा दाम्पत्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या घोषणेनंतर निर्माण झालेल्या वादात राणा दाम्पत्याला ( Mumbai Police Arrest Navneet And Ravi Rana ) पोलिसांनी अटक केली आहे.
- राणा दाम्पत्याचे वकील आबाद पोंडांचा युक्तीवाद -
'राणा दाम्पत्याची आठ वर्षांचे मुल घरी आहेत' -आज कुठे उभे राहून प्रार्थना बोलणे कठीण झाले आहे. हनुमान चालीसा म्हणणार म्हणून जेलमध्ये जावं लागतंय. मी आज कोर्टाचा वेळ घालवणार नाही. पण फक्त एवढेच सांगायचे आहे की दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे आठ वर्षांचे मुल घरी आहे. दोघेही अमरावतीवरुन मुंबईला आले. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणणार असं बोलले होते. मातोश्री हे मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान आहे. शासकीय निवासस्थान नाही. तरीही दोघांना कलम 149 नुसार नोटीस पाठवली होती. आजची सुनावणी मनी लॉन्ड्रिंग किंवा दुसऱ्या गंभीर गुन्ह्यातील नाही. आरोपीला एकाही दिवसाची कोठडी मिळाली नाही आहे आणि ते जेलमध्ये आहेत. त्यांना हनुमान चालीसा शांतीत वाचायची होती. महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही पती पत्नी अमरावतीतील लोकप्रतिनिधी आहेत. मुद्दा एवढा आहे की राणा दाम्पत्यांना उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचायची होती.
'वर्षा नाही मातोश्री हनुमान चालीस' -वर्षा नाही तर मातोश्रीमुख्यमंत्र्यांचेखासगी निवासस्थान आहे. पोलिसांनी त्यांना 149ची नोटीस दिली होती. आम्हाला कोणतीही हिंसा करायची नव्हती. हनुमान चालीसा वाचायची असताना हिंसा का करु? आम्ही कोणत्याही धर्माला इजा पोहोचवणार नव्हतो. मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्याच घरासमोर हनुमान चालीसा वाचायची होती. हनुमान चालीसा वाचून आम्ही मातोश्रीचा अपमान कुठे करत होतो? शिवसैनिकांनी चॅलेंज केले की आम्ही त्यांना इथे जाऊ देणार नाही. मातोश्रीवर जावून हनुमान चालीसा बोलणे यांत देशद्रोह कुठे आला? दोन दिवसांपूर्वीच लंडन ब्रीजवर हनुमान चालीसा म्हटली गेली. पण आम्ही मातोश्री समोर बोलू शकत नाही. त्यादिवशी आम्ही 3.46 वाजताच स्पष्ट केले होते की आम्ही मातोश्रीवर जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने कलम 124A बाबत केदारनाथ प्रकरणात महत्वपूर्ण निकाल दिलाय. आम्ही बोललो होतो हनुमान चालीसा मातोश्री बाहेर बोलणार पण बोललो नाही. तरीदेखील आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आम्हाला अटक केली. सरकार विरोधात हिंसात्मक कृती केली तर तो देशद्रोहाचा गुन्हा होतो असा निकाल केदारनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. आम्ही हनुमान चालीसा म्हणू असं बोललो होतो ते तर केले नाही. तरीदेखील आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावला. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याकरता ते दोघेच फक्त जाणार होते. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना नेणार नव्हतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. याशिवाय दोघेच असताना तेही लोकप्रतिनिधी हिंसा करु शकतील? दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्ततव्य दोघांनीही कधीच केले नाही.
'सरकारवर टीका करणे ही लोकशाहीतील खुबी' -यावेळी वकील आबाद पोंडा यांनी सूनैना होले यांच्या संदर्भात कोर्टाने दिलेला निर्णय वाचून दाखवला. सुनैना होले हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर टीका केली होती. त्यानंतर कोर्टाने सूनैना होलेची सुटका केली होती आणि सरकारवर ताशेरे ओढले होते, असे राणा दाम्पत्यांचे वकील म्हणाले. सरकारवर टीका करणे ही लोकशाहीतील खुबी. जेव्हा राजकीय पक्षांचे सर्वोच्च नेते सरकारमध्ये सर्वोच्च पदावर असतात, तेव्हा त्यांच्यावर केलेली टीका ही सरकारवर केलेली टीका असते. व्यक्तिविशेषवर नव्हे असं बोलून आबाद पोंडा यांनी त्यांचा युक्तीवाद संपविला.
- विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांचा युक्तिवाद
'राज्यात सर्वांनाच बोलण्याचा अधिकार' -राज्यात सर्वांनाच बोलण्याचा अधिकार आहे. सरकार चुकीचे काम करत असेल, तर त्यांना बोलणे यांत काही गैर नाही. पण राणा दाम्पत्या प्रकरण वेगळे आहे. त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या होत्या आणि त्यांनी सरकारला चॅलेंज केलं होतं. सरकारचं लोकशाहीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये नागरी हक्कांना सुद्धा मर्यादा आहेत. राणा पती पत्नीने सर्व मर्यादा ओलांडत चॅलेज केलं. प्रार्थना म्हणणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण राणा प्रकरणात तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी 149 नोटीस बजावली कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हनुमान चालीसा पठण गुन्हा कसा? असे विचारले.
पण पठण करणे हा गुन्हा नाही. पोलिसांनी मातोश्रीवर जाऊ नका असे वारंवार सांगितलं. अशा परिस्थितीत आज्ञाधारक नागरिक काय निर्णय घेऊ शकतो? तो न घेता राणा पती पत्नींनी आक्रमक भूमिका घेतली जी भूमिका टीव्ही चॅनलने दाखवल्या, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.