महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिक्षणच नाही तर फी कशाची?; शैक्षणिक शुल्क माफ करण्याची निवासी डॉक्टरांची मागणी - शैक्षणिक शुल्क

मागील 14 महिने ते केवळ कोरोना रुग्णांना उपचार देत असून त्यांच्या पदव्युत्तर विद्याशाखाचा अभ्यास, सराव बंद आहे. तर आता तिसरी लाट येणार असल्याने चालू वर्षातही अभ्यास होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी आता निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केली आहे.

निवासी डॉक्टरांचे आंदोलन
निवासी डॉक्टरांचे आंदोलन

By

Published : May 27, 2021, 10:01 PM IST

मुंबई - राज्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजतागायत राज्यभरातील निवासी डॉक्टर (वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी) काम करत आहेत. मागील 14 महिने ते केवळ कोरोना रुग्णांना उपचार देत असून त्यांच्या पदव्युत्तर विद्याशाखाचा अभ्यास, सराव बंद आहे. तर आता तिसरी लाट येणार असल्याने चालू वर्षातही अभ्यास होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी आता निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केली आहे. मार्डने यासंबंधी वैद्यकीय शिक्षण संचनालयाला पत्रही लिहिले आहे.

सलग दोन वर्षे अभ्यासाविना?

राज्यभरात सुमारे 4 हजार 900 निवासी डॉक्टर आहेत. विविध वैद्यकीय शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांचे शिक्षण सुरू असताना मार्च 2020 मध्ये अचानक कोरोना महामारीचे संकट देशावर आले. त्यातही महाराष्ट्रा सुरुवातीपासून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले असून आरोग्य यंत्रणावर मोठा ताण पडला आहे. अशावेळी निवासी डॉक्टरांची भूमिका महत्वाची ठरली आहे. राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर कोरोना काळाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कोविडसाठी काम करत आहेत. खऱ्या अर्थाने सर्व मोठ्या सरकारी-पालिका रुग्णालयाची भिस्त या निवासी डॉक्टरांवर आहे. त्यामुळे या कोरोना योध्यांचे कौतुक होत आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे या निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे. कारण मागील 14 महिन्यांपासून त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण-सराव सर्वकाही बंद आहे. सर्वच्या सर्व डॉक्टर केवळ कोरोनासाठी काम करत आहेत. त्याचवेळी त्यांचे प्राध्यापकही कोरोनाचेच काम पाहत आहेत. परिणामी 14 महिन्यांपासून शिक्षण बंद आहे. तर आता सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येणार आहे. तर ही लाट किती महिने असेल याचे उत्तर अजून तरी कुणाकडे नाही. तेव्हा 2020-21 वर्ष विना शिक्षण गेले तर आता 2021-22 ही असेच जाणार आहे. त्यामुळे जर शिक्षण नसेल तर मग फी कसली? असा सवाल करत मार्डने दोन वर्षाची फी माफ करावी अशी मागणी उचलून धरली आहे.

शिक्षण नाही तर मग फी पण नाही!

सलग दोन वर्ष आमचे शिक्षण-प्रशिक्षणाविना जात आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारी सुमारे सव्वा लाखांची फी माफ करावी ही आमची मागणी आहे. तसे पत्र आम्ही वैद्यकीय शिक्षण संचनालयाला दिले असल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी दिली आहे. जीवाची बाजी लावत कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या आम्हाला सरकारकडून 10 हजार रुपये कोविड भत्ता वगळला तर काही मिळत नाही. त्यात कोरोना-लॉकडाऊनचा आर्थिक फटका अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला बसला आहे. मोठ्या संख्येने शेतकरी-मध्यम वर्गीय कुटुंबातील हे विद्यार्थी असून अनेकांची कुटुंब सद्या आर्थिक अडचणीत आहेत. तेव्हा या बाबीचा तसेच शिक्षण बंद असल्याचा मुद्दा लक्षात घेत सरकारने दोन वर्षाची फी माफ करावी, असेही डॉ. ढोबळे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरात प्रतिकात्मक आंदोलन दोन वर्षाची फी माफ करण्याची मागणी मार्डची आहे. जवळपास तीन महिन्यापूर्वी मार्डने पत्राद्वारे ही मागणी वैद्यकीय शिक्षण संचनालयाकडे केली आहे. मात्र यावर अजूनही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता ही मागणी जोरात उचलून धरण्यात आली असून आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी निवासी डॉक्टर प्रतिकात्मक आंदोलन करत आहेत. आज मुंबईत नायर आणि सायन रुग्णालयात फी माफ करण्यासाठीसंबंधीचे फलक घेत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयातही निवासी डॉक्टर आज (गुरुवार) आंदोलन करताना दिसले. सरकार या मागणीकडे कानाडोळा करत असल्याने निवासी डॉक्टरामध्ये नाराजी आहे. त्यामुळे जर येत्या काही दिवसात यावर काही ठोस निर्णय झाला नाही तर पुढची दिशा काय असेल, हे मार्डकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details