मुंबई -लांब पल्ल्याच्या गाडीचे आणि लोकल तिकीट हे प्रवाशांना जलद गतीने मिळण्यासाठी भारतीय रेल्वेने विविध ( Indian Railway Ticket Booking service ) पावले उचलली आहेत. पीआरएस केंद्र, युटीएम, एटीव्हीएम मशीन आणि जीटीबीएस केंद्रासारख्या अनेक सुविधा प्रवाशांसाठी सुरु केल्या आहेत. त्यामुळे आज प्रवाशांना जलद गतीने रेल्वेचे तिकीट मिळणे शक्य झाले आहे. याबद्दलचा ईटीव्ही भारताचा हा खास रिपोर्ट...
तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी -
भारतीय रेल्वेकडे 12 हजार 717 पॅसेंजर ट्रेन तर 7 हजार 349 माल गाड्यांचा ताफा आहे. यातील दररोज 12 हजार ट्रेन धावत असून त्यामधून दोन कोटी 3 लाख प्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस भारतीय रेल्वेची प्रवासी संख्या झपाट्याने वाढत जात आहे. त्यामुळे आरक्षित आणि अनआरक्षित तिकीट काढण्यासाठी रेल्वेचा तिकीट खिडक्यांवर मोठ्या प्रवाशांची गर्दी दिसून येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांना जलद गतीने तिकीट मिळण्यासाठी भारतीय रेल्वेची उपाययोजनासह प्रवाशांना आरक्षित, अनारक्षित तिकिटे मिळण्यासाठी रेल्वेने विविध सुविधा सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस), संगणकीकृत पीआरएस केंद्र, यात्री तिकीट सुविधा केंद्र (वायटीएसके), युटीएस अँप, स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन, कॅश-कॉइन आणि स्मार्ट कार्ड ऑपरेटेड (व्हर्सटाइल) तिकीट व्हेंडिंग मशीन, जीटीबीएस, वायटीएसके, स्थानकावरील तिकीट बुकिंग एजंट (एसडीबीए) या सारख्या तिकीट सुविधामुळे आज नागरिकांना मोठ्या जलद गतीने रेल्वे तिकीट काढणे शक्य झाले आहे. याच बरोबर रेल्वेचा तिकीट खिडक्यावरील गर्दी सुद्धा कमी झाली आहे.
काय आहे सुविधा -
भारतीय रेल्वेच्या विविध स्थानकांवर अंदाजे 9 हजार 983 अनारक्षित तिकीट प्रणाली (युटीएस), 2 हजार 737 स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग यंत्र (ATVMS) /कॅश-कॉइन आणि स्मार्ट कार्ड ऑपरेटेड (व्हर्सटाइल) तिकीट व्हेंडिंग यंत्र (CoTVMs) उपलब्ध करून देण्यात आली आहे. टपाल कार्यालयांमध्ये संगणकीकृत पीआरएस केंद्राद्वारे आरक्षित तिकीट मिळवण्याची सुविधा 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती. सध्या ही सुविधा सुमारे 375 टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच देशभरात 3 हजार 962 ठिकाणी संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) सुविधा केंद्र आहेत. जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जीटीबीएस), यात्री तिकीट सुविधा केंद्र (वायटीएसके), स्थानकावरील तिकीट बुकिंग एजंट (एसडीबीए) इत्यादींद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळाद्वारे आणि मोबाइल अॅपद्वारे आरक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
330 जेटीबीएस केंद्र -
मध्य रेल्वेचा मुंबई विभागात 330 जनसाधारण टिकट बुकिंग सेवक ( jtbs railway ticketing services) आहेत. महिन्याला जेटीबीएसकडून सरासरी पाच कोटीच्या घरात तिकीट विक्री केली जाते. तर प्रत्येक दिवसाला एक लाख 49 हजार तिकीट विक्री केली होते. या माध्यमातून दोन लाख 41 हजार 708 प्रवासी प्रवास करतात. हे जेटीबीएस सेवक प्रत्येक तिकिटावर प्रवाशांकडून अधिकृत 1 रुपये कमिशन अतिरिक्त घेण्याची परवानगी रेल्वेने यांना दिली आहे. त्यांनंतर पुन्हा यांच्या कमिशनमध्ये वाढ करून 2 रुपये करण्यात आले. मात्र 2017 पासून युटीएस अॅप आल्यामुळे आणि वाढती डिजीट तिकीट विक्रीमुळे जेटीबीएस सेवकांचा व्यवसायावर हळूहळू परिणाम दिसू लागला. तरी सुद्धा वेळेची बचत करण्यासाठी आज पण मोठ्या प्रमाणात प्रवासी जेटीबीएस केंद्रावरून तिकीट घेताना दिसून येतात.
हेही वाचा -The Great Freedom Fighter Tatya Tope : जाणून घ्या! नाना साहेबांचे उजवे हात असलेले स्वातंत्र्य सैनिक तात्या टोपे यांची वीरगाथा