महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासा! धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे - renu sharma case withdrawal

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. रेणू शर्मा यांनी ही तक्रार केली होती. तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.

munde
धनंजय मुंडे

By

Published : Jan 22, 2021, 8:43 AM IST

Updated : Jan 22, 2021, 10:55 AM IST

मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ही तक्रार केली होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचं रेणू यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्या नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. हे प्रकरण पाहिल्यानंतर पहिल्यांदाच काही तरी गडबड असल्याचे वाटले होते. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे आपण म्हटले होते. शिवाय सत्यता पडताळून पाहण्याची गरजही बोलून दाखवली होती. त्यामुळे आमचा अंदाज बरोबर ठरला असेही पवार यांनी सांगितले.

...तर न्यायालयात जाण्याचा दिला होता इशारा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केलेल्या रेणू शर्माचा जबाबही नोंदवला गेला होता. शर्मा यांनी सात तास सहायक पोलीस आयुक्त कार्यलयात जबाब दिला. मात्र, पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेतलेली नाही. जर तक्रार दाखल करून घेतली नाही तर, स्थानिक न्यायालयात जाण्याचा इशारा रेणू शर्मा यांच्या वकिलांनी दिला होता. मात्र आता तक्रारच मागे घेण्यात आली आहे.

सत्याचा विजय होतो - कृष्णा हेगडे

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱया महिले विरोधात भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनीसुद्धा तक्रार दाखल केली होती. 2010पासून ही महिला आपल्याला व्हॉट्सअ‌ॅपवरून सतत मेसेज करून संपर्क साधून मैत्री करण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप हेगडे यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण मिळाले होते. आता रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्याने देगडे यांनी देखील आपली तक्रार मागे घेतली आहे. शेवटी सत्याचा विजय होतो. राजकारणातील 'मीटू' प्रकरणे थांबवली पाहिजेत, असेही हेगडे म्हणाले.

भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी तक्रार मागे घेतली

काय आहे प्रकरण -

रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा आरोप आहे की, 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचे आमिष दाखवून त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले होते

या महिलेच्या बहिणीसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना माहित होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. ही महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत, अशी माहिती मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली

Last Updated : Jan 22, 2021, 10:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details