मुंबई - पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलासा दिला आहे. मंदाकिनी खडसे यांना तूर्तास अटक करू नये असे निर्देश ईडीला दिले आहेत. याकाळात दर मंगळवार आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावणे मंदाकिनी खडसेंना अनिवार्य केले आहे. तसेच पुढील सुनावणी पर्यंत ईडीला सहकार्य करण्याचे मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे
तपास यंत्रणेला सहकार्य करा -
पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले असता त्यांनी त्या विरोधात मुंबईच्या सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सत्र न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज (गुरुवार) त्यावर सुनावणी झाली. मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना तूर्तास अटक करू नये असे निर्देष न्यायालयाने ईडीला दिले आहेत. १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे न्यायालयाने मंदाकिनी खडसेंना निर्देश दिले असून याकाळात दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावणे मंदाकिनी खडसेंना अनिवार्य केले आहे.
मंदाकिनी खडसे यांचा जामीन अर्ज फेटाळला -
पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी आरोपी असून त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. या वॉरंट विरोधात मंदाकिनी खडसे मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि अटक पूर्व जामिन अर्ज दाखल केला गेला होता. मुंबई सत्र न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली असता कोणताही दिलासा न देता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंची शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना बरे होण्यासाठी अजूनही काही दिवस लागणार आहे. यामुळे एकनाथ खडसे कोर्टात उपस्थित राहू शकणार नाही, याकरिता आम्हाला काही अवधी द्यावा अशी मागणी मंदाकिनी खडसे यांच्यावतीने सत्र न्यायालयाला केली होती. सत्र न्यायालयाने ही बाब लक्षात घेत, एकनाथ खडसे ह्याना न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी वेळ दिला गेला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.