मुंबई - बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणी राजकारण तापू लागले आहे. या आत्महत्येच्या घटनेनंतर विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर त्या तरुणी संदर्भातील काही ऑडिओ क्लीप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर तिच्या आत्महत्येशी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या आत्महत्या प्रकरणानंतर बंजारा समाजात देखील प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्रातून केली आहे. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे, मात्र, अद्याप मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री यांनी कोणीच चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ईटीव्ही भारतने राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाचा घेतलेला आढावा.
वाट कसली पाहता, मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - भाजप नेत्या चित्रा वाघ
पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे आणि यासंदर्भातील काही ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलचा मोठा पुरावा आहे. मोबाईलमध्ये झालेल्या संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत. ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना मंत्र्याकडून होताना सगळ्यांनी ऐकल्या आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
या सर्व प्रकरणाबाबत पोलिस कोणताच पवित्रा किंवा काहीही स्पष्टता देत नाही. पूजा चव्हाणच्या परिवारावर दबाव असू शकेल पोलिस अशा केसेसमध्ये स्यु-मोटो दाखल करुन घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नको. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. मुख्यमंत्री महोदय, एवढे पुरावे असतांना मुसक्या आवळायाच्या सोडून कसली वाट बघताय?' असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाच्या कुटूंबीयांची आहे. त्यानंतर आता भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका केली आहे.
तर कारवाई होईलच - अजित पवार
या आत्महत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले, 'या प्रकरणाची चौकशी पोलीस विभागाकडून सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर आल्यास पुढे कारवाई होईल.'
देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना लिहले पत्र-
पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, स्व. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून स्व. पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
धक्कादायक घटना, सखोल चौकशी करा- पंकजा मुंडे
परळी मतदारसंघाच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी देखील टि्वट करत 'पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे.
राज्य सरकारवरचा विश्वास उडेल - चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण प्रकरणातही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी कारवाई केली नाही तर महिलांचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल,अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी - बबनराव लोणीकर