मुंबई- महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृतांमध्ये तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यापैकी रंजना तांबे (४०) या डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या होत्या. घरातील कामे आटोपून त्या रुग्णालयात कामावर जाण्यासाठी निघाल्या, मात्र मध्येच त्यांना मृत्यूने गाठले.
CSMT Fob Collapse: ज्या रुग्णालयात कामासाठी निघाल्या; तिथे पोहोचला त्यांचा मृतदेह
डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. गुरुवारच्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून त्या जी.टी. रुग्णालयात रात्रपाळी निघाल्या
डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. गुरुवारच्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून त्या जी.टी. रुग्णालयात रात्रपाळी निघाल्या. मात्र, मध्येच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पुलावरून निघाल्या. त्याचक्षणी त्यांच्या पायाखालचा पूल कोसळला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेनंतर ज्या रुग्णालयात त्या कामासाठी जाणार होत्या, त्याच रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला.
रंजना तांबे या त्यांच्या आईसोबत डोंबिवलीतील गणेश नगरमधील शिवसागर सोसायटीत राहत होत्या. वयोवृद्ध आईला रंजना तांबे या एकमेव आधार होत्या. घरातील कमावत्या रंजना गेल्याने तांबे कुटुंबाचा आधारच हरपला. आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, त्या एका पायाने अपंग होत्या. मात्र, त्या मोठ्या उमेदीने जी. टी. रुग्णालयात रुग्णांची सेवा करीत होत्या. या घटनेनंतर त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.