मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधून मागील काही महिन्यात अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपसह सेनेत प्रवेश केला. आता विधानपरिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर हे देखील आपल्या हातावर शिवबंधन बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण येथे झालेल्या बैठकीत रामराजे निंबाळकरांनी हा निर्णय घेतला. या बैठकीला संजीवराजे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सदस्य दत्ता अनपट, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ यांच्यासह फलटण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांसह कार्यकर्त्यांनी निंबाळकरांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला असल्याचे सांगण्यात येते.
सभापतीपद टिकवण्यासाठी रामराजेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; शिवबंधनात अडकणार - विधानपरिषद
विधानपरिषदेत पुढील वर्षेभरात राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी होणार असल्याने आपले सभापतीपद धोक्यात येऊ शकते अशी भिती रामराजे नाईक-निंबाळकर यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानपरिषदेत पुढील वर्षभरात राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी होणार असल्याने आपले सभापतीपद धोक्यात येऊ शकते अशी भिती रामराजे नाईक-निंबाळकर यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काही दिवसातच ते घड्याळ सोडून आपल्या हातात शिवबंधन बांधणार आहे. तसेच त्यांच्यासोबतच आपले जावई व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार डॉ. राहुल नार्वेकर यांचेही सेनेत पुनर्वसन होणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा मोठा गड मानला जात होता. परंतु लोकसभा निवडणुकीपासून येथे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजप आणि सेनेते जात आहेत. यापूर्वी साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर आता रामराजे नाईक हेही राष्ट्रवादीला सोडून सेनेत जाण्याच्या तयारीला लागले आहेत. तसेच दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले ही भाजपात जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीला अजून मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.