महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 2, 2022, 2:37 PM IST

ETV Bharat / city

Ramdas Kadam On shiv sena : शिवसेनेचा भगवा झेंडा कायम खांद्यावर असेल - रामदास कदम

अनिल परब यांच्यावर टीका केल्यापासून शिवसेना नेते रामदास कदम आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वितुष्ठ निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात भाजपचा भगवा खांद्यावर असेल का? यावर माझ्या खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचाच भगवा असेल, असे सांगत पक्ष बदलाच्या वृत्ताला त्यांनी पूर्णविराम दिला. मी जीवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नसल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

Ramdas Kadam
शिवसेनेचे नेते रामदास कदम

मुंबई - शिवसेनेचे आक्रमक नेते रामदास कदम यांच्याबाबत अनेकदा पक्ष बदलाच्या वावड्या उठल्या. मात्र, मी जीवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवसेना प्रमुखांचा आणि शिवसेनेचा भगवा झेंडा कायम खांद्यावर असेल, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले. मुंबईत खासदार संजय राऊत यांची आज भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खेडमधील जागर कदम वंशाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राऊत यांच्या भांडूपमधील घरी रामदास कदम यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, कितीही अफवा उठल्या बदनाम केले, तरी भगव्याची साथ सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम - सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय धुरळा उडाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांना राज ठाकरेंच्या हिंदुत्वावरून छेडले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, भविष्यात भाजपचा भगवा खांद्यावर असेल का? यावर माझ्या खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचाच भगवा असेल, असे सांगत पक्ष बदलाच्या वृत्ताला त्यांनी पूर्णविराम दिला.

शिवसेना पक्षप्रमुखांची नाराजी -गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांच्यात दुरावा आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकामांबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांना रसद पुरवली, असा रामदास कदम यांच्यावर ठपका आहे. तसेच कदम यांनी जाहीरपणे पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आणली होती. पक्षांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दुरावा आहे.

रामदास कदम आक्रमक नेते -बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले रामदास कदम शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून कदम शांत होते. मात्र सध्या हिंदुत्वाचा मुद्दा गाजतो आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून आक्रमक फळी तयार केली जात आहे. यासाठी जुन्या शिवसैनिकांना पुन्हा हाताशी धरण्यात येत असल्याचे समजते. आज कदम यांनी राऊत यांची भेट घेतली, यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेना आता अधिक आक्रमक होणार असल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details