मुंबई -राज ठाकरे हे जबाबदार राजकीय नेते आहेत. त्यांनी गोळ्या घालण्याची केलेली भाषा ही असंवैधानिक आहे. हिंसेला प्रोत्साहन देणारी भाषा कोणीही वापरू नये. जर सगळेच असे हिंसक बोलू लागले तर दोन्ही बाजुनी हिंसाचार होईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तबलिगी जमातीने गर्दी जमवण्याचा केलेला प्रकार निषेधार्ह आहे. तबलिगी प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कठोर कारवाई करावी. मात्र, गोळ्या घालण्याची भाषा कोणी करू नये. गोळ्या घालायच्या असतील तर पाकिस्तानातील अतिरेक्यांना घाला, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी ट्विटरवर एका व्हिडिओद्वारे आपले मत व्यक्त केले आहे...
'राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली असंवैधानिक भाषा त्यांच्या सारख्या जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही. तबलिगिंनी केलेल्या गर्दीचे आम्ही समर्थन करीत नाही. त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्या आहेत तर पाकिस्तानमधील अतिरेक्यांना घाला' अशा भाषेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे.