मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागोमाग एक गौप्यस्फोट होताना दिसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर, आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपासह मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रतिक्रिया नोंदवत चौकशी आणि राजीनाम्याची मागणी केली आहे.
तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा - राज ठाकरे
"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी." अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही- रामदास आठवले
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप गृहमंत्र्यांनी नाकारले आहेत. मात्र, असा प्रकार देशात कधीच कुठे घडला नाही. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा कोलमडली आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या लौकीकावर कलंक लागला आहे. मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही; अशा आशयाचे ट्विट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.