मुंबई -एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले असून रविवार ( 3 जुलै ) आणि सोमवार ( 4 जुलै ) असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. 3 तारखेलाच अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच संख्याबळाचा फैसला होणार असला तरी या निवडणुकीवर विरोधकांनी, प्रामुख्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर रंगतदार ठरत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपकडून नार्वेकर यांनी अर्ज भरला -भारतीय जनता पार्टीच्या ( BJP ) वतीने राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker election 2022 ) निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. राहुल नार्वेकर यांना उभे करून भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडले आहे. कारण राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेना नंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपा असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक तशी एक शिवसैनिक विरुद्ध दुसरा शिवसैनिक अशीच होत आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीच्या माध्यमातून शिवसेनेतील ( Shivsena ) आणखी काही मते फोडण्याचा भाजपची रणनीती आहे.
शिवसेनेचे राजन साळवी अध्यक्षपदाच्या शर्यतीत - विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker election 2022 ) निवडणुकीसाठी शिवसेनेकडून राजन साळवी ( Rajan Salvi ) यांनी आपला अर्ज भरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल केला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी म्हटले होते. पण अखेरच्या क्षणी काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी ( MVA Speaker Election Candidate Rajan Salvi ) यांना पाठिंबा देण्याचे ठरवले, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांची भूमिका महत्त्वाची -राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगत 3 व 4 जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. 3 जुलैला प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला सर्वप्रथम काँग्रेसने आक्षेप घेतला. जानेवारी २०२१ रोजी काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra assembly speaker election ) यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. आता काँग्रसने आता आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना लक्ष्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आपण जवळपास तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती. मग, आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी उपस्थित केला आहे.