मुंबई -कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू ( Primary schools to start in Maharashtra ) होणार आहेत. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या ( Maharashtra cabinet decision ) बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, की राज्यात आता पहिली ते बारावीपर्यंत आता सर्व शाळा सुरू होणार आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी शाळा सुरू झाल्या आहेत. मागील काळात आम्ही मोठी खबरदारी घेतली होती. ही सर्व मुले छोटी आहेत. पण, तरीही या मुलांना शाळेत आणणे महत्त्वाचे आहे. टास्क फोर्सशीदेखील आम्ही चर्चा करणार आहोत
परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय-
शिक्षकांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, यावर आम्ही अभ्यास केला आहे. आम्ही आठ दिवस पालकांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर देणार आहोत. निवासी शाळाबाबत आम्ही लवकर निर्णय घेऊ. दिवाळीनंतर काय परिस्थिती आहे, हे पाहून आम्ही प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी पूर्ववत जीवनात यायला हवेत. त्यासाठी आम्ही आज शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचा निर्णय आल्यानंतर आम्ही या शाळा सुरू करत आहोत. तिसऱ्या लाटेवर आमची नजर होती. मात्र, परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांना तब्येतीसाठी शुभेच्छा
मुख्यमंत्री व्हीसीद्वारे कॅबिनेटमध्ये आले होते. त्यांची तब्येत लवकर सुधारावी अशा माझ्या शुभेच्छा आहेत. लवकरच मुख्यमंत्री आपल्या सर्वांना भेटतील, असेही शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.