मुंबई- मराठा, ओबीसी राजकीय आरक्षणाप्रमाणे कृषी कायद्याला राज्यसरकारने बासनात गुंडाळू नये, महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक सरकारने घाईगडबडीमध्ये समंत करू नये, त्यावर चर्चा करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दरेकर यांनी मीडिया हाऊसमध्ये सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
कृषी कायद्यावर चर्चा करा -
केंद्राच्या कृषी कायद्याबाबत गैरसमज अनेक मंडळी पसरवत आहे, कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा केंद्रांचा प्रस्ताव आहे. परंतु कायदा नकोच, अशा प्रकारची भूमिका घेताना काही मंडळी घेताना दिसून येत आहे. मंगळवारी सभागृहात कृषी कायद्यांवर चर्चा करा, पण त्या सुधारणांना विरोध करू नये असे आवाहन दरेकर यांनी केले.
राज्यसरकारने कृतज्ञता बाळगावी -
सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्राने केले आहे याबाबत राज्यसरकारने केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजे. राज्याने 1 रुपयाची लस विकत घेतली नाही. केंद्राने दिलेल्या लसीचे तशाचप्रकारे वितरण केले गेले. केंद्राने राज्यात इतर राज्यांपेक्षा जास्त लसींचे वितरण केले आहेत. यामळे महाराष्ट्र सरकार सर्वाधिक लसीकरण करू शकले. ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही, जास्त लसीची मागणी राज्यसरकार करत असेल तर आमचा पाठिंबा आहे. परंतु केंद्र देत असताना थोडीशी कृतज्ञता व्यक्त करावी असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.