मुंबई - विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. सर्वच पक्षांचे शक्तीप्रदर्शन सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची 'ईटीव्ही भारत'ने मुलाखत घेतली आहे.
हेही वाचा - राजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधानांऐवजी कोण आले? धनंजय मुंडेंच्या 'या' प्रश्नाला जनतेने दिले असे उत्तर
प्रश्न : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जनतेसामोर कोणता विकासासाठी अजेंडा ठेवणार आहेत?
उत्तर : आम्ही पाणी, नोकरी, पोलिसांचे प्रश्न, अंगणवाडी सेविका, आशा कामगार त्यानंतर कोतवाल, शेतकऱ्यांचे प्रश्न असे विविध प्रश्न घेऊन आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीत उतरत आहोत. याच विषयावरचा आमचा जाहीरनामा बाहेर पडेल. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत की, आमच्या या जाहीरनाम्यावर चर्चा होईल.
प्रश्न : राज्यात आपण काढत असलेल्या सत्तासंपादन रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे, याकडे आपण कसे पाहता?
उत्तर : राज्यातील लोकांना आता बदल हवा आहे. जनता तेच तेच बघून कंटाळली आहेत. त्यांना काहीतरी नवं पाहिजे आहे. त्यांना नवा कार्यक्रम पाहिजे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी देत आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे. आम्ही आज राज्यभरात जे विषय घेऊन जात आहोत तेच विषय सर्वपक्षीय लोकसुद्धा मांडत आहेत. त्यामुळे लोकांचा कल हा वंचित बहुजन आघाडीकडे वळताना दिसत आहे.