मुंबई -मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंग ठाकूर या अनेक दिवसांपासून न्यायालयात हजर होत नव्हत्या. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यांना बोलवण्यात आल्यानंतर आज त्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयात तब्येत खराब असल्याचे कारण सांगत, मी न्यायालयात येऊ शकली नाही, मी आज मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल होणार आहे, मात्र न्यायालय मला जेव्हा हजर राहण्याचे सांगेल, त्यावेळी मी हजर राहणार, असे भाजप खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी न्यायालयाला सांगितले.
हेही वाचा -VIDEO : पगारवाढ नको विलीनीकरण करा; आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका
प्रज्ञा ठाकूर न्यायालयात आल्यानंतर त्या जाण्याच्या घाईत असल्याचे दिसून आले. त्यांच्या वकिलांनीही त्या विमानतळावरून आल्या असून आता थेट रुग्णालयात जायचे असल्याचे नमूद केले. त्यावर न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तुम्ही ठीक आहात का? मागील वेळी तुम्ही प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते, अशी विचारणा न्यायालयाने केली. न्यायालयाच्या विचारणेनंतर प्रज्ञा ठाकूर यांनी आता किती दिवस रुग्णालयात थांबावे लागेल, हे डॉक्टर सांगतील, असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना आम्ही बोलावू तेव्हा न्यायालयात हजर रहा, असे सांगितले.