मुंबई -शंभर वर्षांपूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
हेही वाचा -नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल
प्रबोधन नियतकालिकेतील केशव सिताराम ठाकरे यांचे लेख असलेले ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तथा राजा दिक्षित व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रबोधनच्या शताब्दी निमित्त प्रसिद्ध झालेल्या या त्रिखंडात्मक ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनिल कर्णिक व विश्वंभर चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या balasahebthakaray.in या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रबोधनकारांचे विचार जगभारत पोहोचले पाहिजे
आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा प्रबोधनकार यांच्याविषयी आठवणी जागवताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रबोधनकार कडक शिस्तीचे होते, ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या. प्रबोधनकार यांचे विचार जगातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या ग्रंथांचे भाषांतर झाले पाहिजे. शंभर वर्षे झाल्यानंतर माझ्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे, हे माझ्यासाठी समाधान देणारे आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील ‘फटकारे’ पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी होती.