महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत ५२६ कोरोनामुक्त रुग्णांवर पोस्ट ओपीडीत उपचार - post covid recovery

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना निमोनिया, श्वसनाचा त्रास, हात पायांचे सांधे दुखणे, तणाव आदी आजारांनी ग्रासले आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Dec 24, 2020, 3:24 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना निमोनिया, श्वसनाचा त्रास, हात पायांचे सांधे दुखणे, तणाव आदी आजारांनी ग्रासले आहे. त्यासाठी पालिकेने पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे. पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत ३८६ तर गोरेगाव नेस्को येथील पोस्ट ओपीडीत १४० अशा एकूण ५२६ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. कोरोनानंतर इतर आजार होणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. मुंबईत आतापार्यंत २ लाख ८८ हजार ५६१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २ लाख ६८ हजार ५८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ११ हजार ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३६१ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असून रुग्णही कोरोनामुक्त होत आहेत. मात्र, कोरोनामुक्त झाल्यावर इतर आजार रुग्णांना होत असल्याने पालिका रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये पोस्ट ओपीडी सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पालिका रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत ३८६ रुग्णांवर उपचार -

महापालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत १२ डिसेंबरपर्यंत तपासणीसाठी आलेल्या कोरोनामुक्त ३८६ रुग्णांना निमोनिया, श्वसनाचा त्रास, हात व पायांचे सांधे दुखणे, तणाव हे आजार झाल्याचे समोर आले आहे. ३८६ रुग्णांपैकी २२४ पुरुष तर १६२ महिला रुग्ण आहेत. कोरोना विषाणूची लागण होण्यात पुरुषांची संख्या अधिक होती. त्याच प्रमाणे कोरोनानंतरच्या आजारातही पुरुषांची संख्या अधिक आहे. २२४ पुरुष तर १६२ महिलांना कोरोना नंतर इतर आजार झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुक्त झाल्यावर इतर आजार -

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असला तरी कोरोनामुळे इतर आजार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. १ डिसेंबरपर्यंत नायर व केईएम रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत कोरोनाची लागण होऊन त्यातून बरे झाल्यावर पुन्हा त्रास होत असल्याने ३३५ रुग्ण उपचारासाठी आले होते. यामध्ये १९७ पुरुष तर १३८ महिलांचा समावेश होता. या कोरोनामुक्त रुग्णांना निमोनिया झाल्याचे समोर आले आहे. तर काही कोरोनामुक्त रुग्णांना थेरेपीची गरज भासली. नायर व केईएम रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना मध्ये ८० टक्के नवीन केसेस तर २० टक्के जुन्या केसेस होत्या. तर १ डिसेंबरनंतर पोस्ट ओपीडीत येणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. १२ डिसेंबरपर्यंत पोस्ट ओपीडीत ३८६ कोरोनामुक्त रुग्ण विविध आजारांमुळे त्रस्त असल्याने उपचारासाठी आले होते. यामध्ये २२४ पुरुष तर १६२ महिला कोरोनामुक्त रुग्ण असून त्यांना अन्य त्रास होत असल्याचे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

गोरेगाव नेस्कोत १४० कोरोनामुक्त रुग्णांची तपासणी -

गोरेगाव येथील नेस्को जंम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्ण संख्या कमी झाल्याने त्याठिकाणी ३० नोव्हेंबरपासून पोस्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर ते आतापर्यंत १४० कोरोनामुक्त रुग्ण त्रास होत असल्याने पुन्हा तपासणीसाठी आले होते. त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, नेस्को जंम्बो कोविड सेंटरमधील पोस्ट ओपीडीत रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, आरटीपीसीआर, समुपदेशन, तापावर औषध या सगळ्या गोष्टी रुग्णांना मोफत देण्यात येत असल्याचे पोस्ट ओपीडीच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.

हेही वाचा-विशेष : वाहन खरेदीत पुणेकर ठरले देशात अव्वल; जाणून घ्या वर्षभरात किती झाली वाहनांची विक्री

हेही वाचा-नागपूरमध्ये इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला एक तरुण कोरोनाबाधित

ABOUT THE AUTHOR

...view details