मुंबई -अयोध्येमध्ये भव्य असे राम मंदिर उभारण्यासाठी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातून निधी संकलीत केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजप व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजप-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची दाट शक्यता आहे. असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठीचा आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल याची खबरदारी घ्यावी. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यासंदर्भात पत्रकार परिषेदला संबोधित करताना सावंत म्हणाले की, भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराकरता या अगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ साली विश्व हिंदू परिषदेतर्फे १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपाच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती.
निधी संकलन करणाऱ्या भाजपवर हिंदू महासभेचा आक्षेप
४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपातर्फे राम मंदिर निर्मितीकरता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपाला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपाकरता हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. गेल्या तीन दशकामध्ये भाजपने जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असे हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितले आहे. राम मंदिरासाठी भाजपरुपी रावण पैसे गोळा करत आहे, असे म्हणून जर हे निधी संकलन जनतेमध्ये जाहीर केले नाही तर कोर्टात जाऊ, असा इशाराही प्रमोद पंडीत जोशी यांनी दिला आहे.