महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

‘लंबी रेस का घोडा’... मिस्टर क्लिन मुख्यमंत्र्यांची राजकीय घोडदौड जोरात

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे, वसंतराव नाईक यांच्या नंतरचे दुसरे मुख्यमंत्री ठरलेत. नगरसेवक पदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत, एवढा मोठा टप्पा गाठणारे फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात राज्यात आणि देशामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 26, 2019, 5:16 PM IST

Updated : Sep 27, 2019, 6:58 PM IST

मुंबई -पक्षात अनेक मोठे नेते असतानाही त्यांना धोबीपछाड देत, देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पटकावली. गेल्या पाच वर्षांच्या कारभारातून आपण ही जबाबदारी किती समर्थपणे सांभाळू शकतो, हे त्यांनी दाखवूनही दिले. आता राज्याच्या आगामी विधानसभेसाठी भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून पून्हा एकदा फडणवीस यांनाच पसंती असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सभेत आणि अमित शाह यांनी मुंबईच्या गोरेगाव येथील सभेत तसे स्पष्टही केले आहे. यामुळेच नगरसेवकपदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत यशस्वी प्रवास करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेण्याचा ईटिव्ही भारतने केलेला प्रयत्न...

गरसेवक पदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत, फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात राज्यात आणि देशामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षातील प्रवास

३१ ऑक्टोबर 2014 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुरूवातीपासूनच फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवायला सुरूवात केली. प्रशासनावर बढत्या-बदल्यांची; तर राजकीय विरोधकांवर कारवाईची तलवार टांगती ठेवत त्यांनी राज्याच्या कारभाराचा गाडा हाकण्यास सुरूवात केली. केंद्रातील सत्तेचा आपल्यावरील विश्वास वाढवत, मोदींच्या पाठबळावर आणि त्यांच्याच मार्गाने जात फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत राज्यात आपला पक्ष वाढवला. पक्षासोबतच एक कार्यकुशल मुख्यमंत्री म्हणूनही राज्यातील जनतेवर आपली छाप त्यांनी पाडल्याचे दिसत आहे.

हेही वाचा... राज्यातील नातेमय राजकारणाचे 'सासरे-जावई' कनेक्शन...

तसे पाहता वसंतराव नाईक, शरद पवार, वसंतदादा पाटील आदी नेत्यांप्रमाणे फडणवीस यांनी निश्चित असा कोणताही जनाधार नव्हता. मात्र 2014 च्या मोदी लाटेनंतर राज्यातील भाजप सरकारमध्ये त्यांनी नेतृत्वाच्या मिळालेल्या संधीचे सोनं केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नंरेंद्र मोदी नाशिक येथील सभेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा भरभक्कम पाठिंबा या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू आहेत. राजकारणात राजकीय प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केल्याशिवाय टिकाव लागत नाही. त्यांना लगाम लावण्याकरता वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न करावे लागतात. हा नियम पाळत राज्यातील विरोधकांना आणि सत्तेतील भागीदार पक्षाला त्यांनी यशस्वीपणे हाताळले. यामुळेच आजच्या घडीला राज्यात आणि भाजपमध्येही फडणवीस यांना कोणी आव्हान देऊ शकेल असा, भक्कम नेता दिसून येत नाही.

निवडणुकांच्या कसोटीवर फडणवीस

एखाद्या नेत्याच्या राजकीय यश अपयशाचे मुल्यमापन हे त्याच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या यश अपयशांवर केले जाते. फडणवीस सत्तेत आल्यावर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अशा साऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. याला कारण राज्यातील जनतेने फडणवीस यांच्या नेतृत्वावर दाखविलेला विश्वास हाच होता. मात्र हे करत असताना, फडणवीस यांनी राजकीय अपरिहार्यतेतून केलेले समझोते त्यांच्या प्रतिमेला नक्कीच छेद देणारे होते. उदारहणार्थ विविध शहरांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना पक्षात प्रवेश देणे, त्यांना उमेदवारी देणे असे प्रकार घडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह

हेही वाचा... निवडणूक महाराष्ट्राची, पण प्रचाराचा मुद्दा मात्र काश्मीर!

पक्षांतर्गत राजकारणावर वर्चस्व

फडणवीस हे मुख्यमंत्री होण्या अगोदर त्यांच्या पक्षात अनेक नेते हे या पदाच्या शर्यतीत होते. मात्र पक्षश्रेष्ठींचा विश्वास जिंकण्यात फडणवीस यशस्वी झाले. यानंतर मात्र पक्षाबाहेरच्या विरोधकांना आणि पक्षांतर्गत विरोधकांनाही फडणवीस यांनी यशस्वीपणे बाजूला सारले. विधानसभेत खडसे आणि फडणवीस ही भाजपमधील जोडी होती. सत्ता येताच मुख्यमंत्रिपदावरील दावा गेल्याने खडसे नाराज होणे स्वाभाविकच होते. पुण्यातील जमिनीचे प्रकरण पुढे आल्याने (की आणले गेल्याने?) खडसे बदनाम झाले आणि मंत्रिपद सोडावे लागले. फडणवीस यांनी खडसे यांना तर घरचा रस्ता दाखवला पण त्याचबरोबर पंकजा मुंडे वा विनोद तावडे यांच्यासारख्या पक्षाच्या इतर सदस्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेलाही लगाम लावला.

विरोधी पक्षांवर यशस्वी मात

पक्षांतर्गत प्रमाणेच राजकीय विरोधकांमध्ये धडकी भरेल, असे अनेक डाव फडणवीस खेळले. बांधकाम खात्यातील घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकून सुरूवातीलाच त्यांनी विरोधकांना इशारा दिला. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास केल्यावर भाजप प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही व्यवस्थित चाप लावला. राणे यांना राज्यसभेवर पाठवून आणखी एक प्रतिस्पर्धी तयार होणार नाही, अशी खेळी त्यांनी केली.

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भुजबळांना तुरुंगाची हवा खावी लागली, तरी अजित पवार आणि सुनील तटकरे या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत फडणवीस यांनी मवाळ भूमिका घेतली होती. मात्र पवारांच्या विरोधातील चौकशी निर्णायक टप्प्यावर आल्याचे फडणवीस सांगत राहिले. यामुळेच शुक्रवारी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर, बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा... शिवसेनेच्या 'भावी मुख्यमंत्र्यांना' 'जन आशीर्वाद' मिळणार का?

युतीच्या राजकारणात शत् प्रतिशत यश

सत्तेत राहूनही पाच वर्षे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपचा पिच्छा सोडला नाही. त्याच वेळी राजकीय कौशल्य आणि सत्तेचा पुरेपूर वापर करत फडणवीस यांनी शिवसेनेशी कधी गोड बोलून तर कधी इंगा दाखवीत दोन हात केले.

राज्यातील प्रश्नांचा कौशल्याने सामना

राजकीय आघाड्याप्रमाणेच फडणवीस यांची राज्यातील जनतेच्या काही मुलभूत प्रश्नांवर वारंवार कसोटी लागली. मात्र या सर्व प्रश्नांना त्यांनी अतिशय कौशल्याने हाताळले. मराठा समाजाचे आंदोलन, मराठा तसेच धनगर आरक्षणांचा तापलेला मुद्दा, भीमा-कोरेगावचा हिंसाचार हे विषय हाताळताना फडणवीस यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहिली. तसेच नैसर्गीक आपत्तीनेही त्यांना कित्येक वेळा फासात अडकवले. प्रशासकीय पातळीवर पहिल्या वर्षी तर नोकरशाही ऐकत नाही, असा सूर लावला होता. पण नंतर त्यांनी नोकरशाहीवर पकडही निर्माण केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास

नागपूर विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर फडणवीस यांनी डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा पूर्ण केला आहे. फडणवीस १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात उडी घेतली. भाजप युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष ते 2001 ला भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी पक्षांतर्गत जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. याच जोरावर 1992 ते 2001 या काळात सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य आणि सर्वात कमी वयाचे महापौर राहिले आहे. तसेच 1999 पासून विधानसभेकडे आपला मोर्चा वळवत नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. पुनर्रचनेनंतरही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. 2014 साली विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी राज्याचे 18 वे आणि दुसरे तरूण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा... अस्तित्वाची लढाई! विधानसभेच्या निवडणुकीत 'डावे' ठरणार का 'उजवे'?​​​​​​​

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा अभ्यास., या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळेच फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षात स्वतःला सिद्ध करण्यात नक्कीच यशस्वी ठरलेले दिसतात. राजकारण आणि प्रशासन या दोन्ही आघाड्यांवर आपली छाप पाडू शकतो तो राजकारणी यशस्वी होतो. वय ही फडणवीस यांच्यासाठी जमेची बाजू आहे. ४८व्या वर्षी राजकारणात यशस्वी झालेले फडणवीस हे ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून ओळखले जातात. नागपूर, मुंबईतील यशस्वी कामगिरीनंतर दिल्लीत त्यांचा राजकीय प्रवास होऊ शकतो, असेही म्हटले जाते. फडणवीस यांनी मात्र सध्या 'गड्या आपला गाव बरा' ही भूमीका घेतली आहे. यामुळेच महाजनादेश यात्रेतून त्यांनी 'मी पून्हा येईन' नारा दिलाय. आता त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरणार की नाही, हे काही दिवसांत समजेल. मात्र मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांची त्यांची कारकीर्द राज्याच्या राजकीय इतिहासात अढळ राहिल हे निश्चित...

Last Updated : Sep 27, 2019, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details