मुंबई- मनसेची स्थापना होऊन सुमारे 15 वर्षांचा कालखंड उलटून गेला. पंधरा वर्षांच्या काळात राज यांनी घेतलेल्या अनेक भूमिका घेतल्या. त्या तडीस नेण्याऐवजी सातत्याने भूमिका बदलत राहिले. या बदललेल्या भूमिका मनसेवरच बुमरॅंग झाल्याचे आजवर दिसून येत आहेत. अयोध्या दौऱ्यावरुन घेतलेली माघार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आवाजातील करारी बाणाने अनेक विषयांवर ठाम भूमिका मांडता दिसतात. सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होते. पंण, मत परिवर्तनात ही गर्दी दिसत नाही. मनसेच्या पक्ष स्थापनेनंतर राज यांना तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतले. बारा आमदार, २७ नगरसेवक आणि नाशिक महापालिकेची सत्ता हातात दिली. पण, राज ठाकरे यांच्या फटकळ स्वभावामुळे मनसेची अधोगतीला लागली. राज यांनी अनेकदा मोठ्या वल्गना केल्या. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे दिसतांच वारंवार भूमिका बदलल्या. मनसेच्या जडणघडणीपासून आजतागायत राज यांनी मनसेला उभारी देण्याऐवजी इतर पक्षांचे भोई झाल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यात प्रादेशिक पक्षाच्या शर्यतीत असण्याऐवजी मनसे आज चाचपडताना दिसत आहे. अयोध्या वारीला जाण्याची घोषणाही भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या प्रखर विरोध समोर राज निष्पभ्र ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज यांच्याविरोधात तर्कवितर्क रंगवले जात आहेत.
मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा गुढीपाडवा सभेतून राज ठाकरे यांनी देत शिवाजी पार्कचे मैदान मारले. राज्यात यानंतर भोंग्याचा विषयावर राजकारण तापले. तर ठाण्यात सभा घेत, अयोध्येला जाण्याची घोषणा केली. प्रखर हिंदुत्वावादी असलेल्या शिवसेनेपुढे आव्हान निर्माण करण्यात प्रयत्न केला. भाजपने याचा फायदा घेत, राज यांच्या भूमिकेचे स्वागत केले. राज यांचा वाढता प्रभाव जाणवू लागताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार आसूड ओढले. राज्यातील वातावरण त्यानंतर ढवळून निघाले.
झेंडा बदलला -मनसेची स्थापना झाली त्यावेळी धर्मनिरपेक्ष झेंडा होता. वर निळा मध्यभागी भगवा व तळाला हिरवा रंग होता.या दोन रंगांपेक्षा थोडा मोठा भगवा रंग होता. खळखट्याक मनसे स्टाईल महाराष्ट्रात नव्याने जन्माला आली. राज ठाकरे यांनी झेंडा बदलून प्रखर हिंदुत्त्वाची वाटचाल सुरू केली. नव्याने तयार केलेल्या मनसेच्या झेंड्यात आता संपूर्ण भगवा रंग आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. मनसेला उभारी देण्यासाठी मनसेने नवे प्रयोग केले आहेत. या प्रयोगाला खरंच यश मिळते, का ते पहावे लागेल.
विचारसरणीत बदल -मराठीचा मुद्दा हाती घेत, राज ठाकरे यांनी मनसेच्या वाटचालीला सुरुवात केली. परप्रातियांवर टीका करत कट्टर मराठी भाषावादी असल्याचे दाखवून दिले. सध्या मशिदीवरील भोंगा, हनमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करत राज यांनी हिंदुत्वाची कास धरली आहे. अंगावर भगवी शाल पांघरलेले राज ठाकरे आज पहायला मिळतात. एकेकाळी धर्मनिरपेक्ष असलेला पक्ष हिंदुत्वाच्या दिशेने निघाला आहे. राज यांच्या आजवरच्या विचारसरणीत पूर्णपणे बदल झाला आहे. राज्यातील जनता राज यांना खरंच साथ देईल का, ते पहावे लागेल.
संघटनात्मक बांधणी अभाव -राज्यात मनसे स्थापन झाल्यानंतर राज यांच्यासोबत अनेक कट्टर शिवसैनिक गेले. शिवसेनेला त्यावेळी मोठी भगदाड पडली होती. अनेकांनी शिवसेना संपली, असे भाकित वर्तवले होते. मनसेत निराश झालेल्या शिशीर शिंदे, प्रकाश पाटणकर, दिलीप लांडे, आदित्य शिरोडकर आदी राज यांचे कट्टर समर्थकांनी काहीच वर्षात शिवसेना पक्षात घरवापसी केली. राम कदम, प्रविण दरेकर, मंगेश सांगळे आदींनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राज ठाकरे यांची संघटनात्मक बांधणीचा अभाव असल्याने मनसेची आजची स्थिती डळमळीत झाली आहे.
टोल नाक्याचे आंदोलन अपयशी -नागरिकांना भेडसावणाऱ्या टोल विरोधात मनसेने आंदोलन हाती घेतले. टोल नाके यावेळी मनसेकडून फोडण्यात आले. त्यामुळे टोलच्या प्रश्नांवर त्रस्त झालेल्या लोकांना मनसेबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, टोल नाक्याचा मुद्दा मनसेने सोडून दिल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडली.