महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray : निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या राज ठाकरेंना "श्री राम" तारणार..? - राज ठाकरे आयोध्या दौरा

राज ठाकरे यांच्या आयोध्या ( Ayodhya ) दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांची प्रतिमा हिंदुत्त्ववादी नेता म्हणून उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे यांनी सध्या घेतलेली भूमिका भारतीय जनता पक्षाला मदत देणारीच ( BJP ) आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या माध्यमातून शिवसेनेसमोर एक वेगळा पर्याय लोकांना देण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सातत्याने बदलणार्‍या भूमिकांमुळे सामान्य जनतेमध्ये राज ठाकरेंच्या बाबतीत कितपत विश्वासार्हता आहे याबाबतही मतमतांतरे आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी घेतलेली लाऊडस्पीकर बाबतची भूमिका ही थेट हिंदू मतदारांसाठी खूप महत्त्वाची आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे

By

Published : Apr 19, 2022, 7:34 PM IST

मुंबई- गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने राज ठाकरेंना ( Raj Thackeray ) अपयश येत आहे. मात्र, सध्या राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका तसेच आयोध्या दौर्‍याला जाण्याचा घेतलेला निर्णयामुळे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. काठावर असलेली हिंदू मते या भूमिकेमुळे राज ठाकरेंना मिळतील, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे यांनी दोन एप्रिलला गुढीपाडवा मेळावा दरम्यान केलेले भाषण आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत केलेल्या भाषणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा राजकीय पुनर्जीवित झाल्याचे पाहायला मिळते. मशिदीवर लावण्यात येणार्‍या लाऊडस्पीकरचा मुद्दा राज ठाकरे यांनी लावून धरला आहे. बेकायदेशीररित्या मशिदीवर लाऊडस्पीकर लावले जातात. त्या लाऊड स्पीकरचा त्रास सामान्य जनतेला होतो. त्यामुळे 3 मेपर्यंत हे लाऊडस्पीकर बंद केले नाही. तर, राज्यभरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी याबाबत तातडीची बैठक घेतली. यातून लाऊडस्पीकर लावण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दोनच दिवसांत राज्य सरकारकडून जाहीर केले जातील, असे सांगण्यात आले. तसेच राज्याचे पोलीस महासंचालकांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांची बैठकही घेतली आहे. या बैठकीतून लाऊडस्पीकरबाबत आता नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच राज्यात धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी असणार आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यभरात याबाबतची चर्चा सुरू आहे. गेली अनेक वर्षे राजकारणात मागे पडलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे पुनर्जीवित झाला अशी स्थिती आहे.

5 जूनला राज ठाकरेंचा आयोध्या दौरा -लाऊडस्पीकरच्या मुद्द्याची महाराष्ट्रात चर्चा असतानाच पाच जूनला राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी जय्यत तयारी पक्षाकडून केली जात असून सुमारे दहा हजार कार्यकर्ते यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहेत. यासाठी दहा ते बारा एक्सप्रेस गाड्या निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हिंदुत्ववादी विचाराला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आयोध्या दौरा करून आपण हिंदुत्त्वाची कास कधीही सोडली नाही हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना गेल्यानंतर त्यांनी हिंदूत्त्व सोडले, असल्याची टीका सातत्याने भाजपाकडून करण्यात येते आहे.

राज ठाकरे यांच्या माध्यमातून वेगळा विकल्प तयार करण्याचा प्रयत्न -राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांची प्रतिमा हिंदुत्त्ववादी नेता म्हणून उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे यांनी सध्या घेतलेली भूमिका भारतीय जनता पक्षाला मदत देणारीच आहे. राज ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेसमोर एक वेगळा पर्याय लोकांना देण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सातत्याने बदलणार्‍या भूमिकांमुळे सामान्य जनतेमध्ये राज ठाकरेंच्या बाबतीत कितपत विश्वासार्हता आहे याबाबतही मतमतांतरे आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी घेतलेली लाऊडस्पीकर बाबतची भूमिका ही थेट हिंदू मतदारांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये नक्कीच राज ठाकरे यांना याचा फायदा होईल. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन काहीशी नाराजी हिंदू मतदारांमध्ये नक्कीच आहे. त्याचाही फायदा राज ठाकरे यांना कोठेतरी नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे मागील काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फटका बसला तरी आता ज्याप्रकारे राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेत लाऊडस्पीकरचा मुद्दा आणि आयोध्या दौरा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा निवडणुकीमध्ये फायदा पाहायला मिळेल, असे मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.

कमी होत जाणारे मताधिक्य -राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मार्च, 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. पक्ष स्थापननंतर संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत जनतेने मनसेचे 11 आमदार निवडून दिले होते. नाशिक महानगर पालिका मनसेच्या ताब्यात होती. तर मुंबई महानगर पालिकेसह इतर ठिकाणीही मनसेला चांगले यश मिळाले होते. हा राज ठाकरे यांचा प्रभाव होता. यानंतर मनसे आणि राज ठाकरे हे कधीही मागे वळून पाहणार नाहीत, असे वाटत होते. मात्र, राज ठाकरे यांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत गेला. राज ठाकरे यांनी वेळोवेळी बदलेल्या राजकीय भूमिकेचा फटका प्रत्येक निवडणुकीत त्यांना बसला. 2014 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाने सपाटून मार खाल्ला. तर 2019 साली आपल्या वैयक्तिक कारणावरून पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नाही. तर विधानसभा निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून आला. त्यामुळे आता पुन्हा राज ठाकरे ऍक्टिव्ह झाले आहेत. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपली ताकत दाखवली आहे. राज ठाकरे नेहमीच तरुणांचा आकर्षण राहिले आहेत. त्यांनी घेतलेल्या मुद्द्यांमुळे त्यांना राजकीय फायदा होणार म्हटले जात आहे. त्यामुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून राज ठाकरे यांना कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी पुढील काळात राज ठाकरेची दखल महा विकास आघाडीला घ्यावीच लागणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -Building Part Collapsed : काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळला, कोणीही जखमी नाही

ABOUT THE AUTHOR

...view details