नवी दिल्ली/ मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. कोरोना लस वितरण धोरण आणि काही राज्यात नव्याने कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर होते.
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना -
कोरोना लसीबाबत आम्ही सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण कसे होणार यासंदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले.
यापूर्वी, 23 सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. तर 11 ऑगस्टलाही पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत, त्या राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध सूचनाही केल्या होत्या.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ -
देशाता कोरोनाचा प्रसार झाला असून महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगडसह एकूण 15 राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. येथील परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याकरिता उच्चस्तरीय केंद्रीय समिती या राज्यांमध्ये रवाना करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. दिल्लीत कोरोचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे दिल्लीकडे जाणारी आणि येणारी विमाने बंद करण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. तसेच दिवाळीमुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी पहायला मिळाली. यामुळे कोरोना संसर्ग वाढत असून येत्या काही दिवसांत लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिला.
गुजरात आणि राजस्थानमध्ये नाइट कर्फ्यू -
गुजरातमध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये या चार शहरांमध्ये सोमवारपासून 'नाइट कर्फ्यू' लागू केला जाईल, असे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी रविवारी सांगितले. तसेच राजस्थान सरकारनेही 8 जिल्ह्यांत नाइट कर्फ्यू घोषीत केला आहे. तसेच विवाहसोहळा आणि राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये केवळ 100 लोकांनाच परवानगी असेल, असे आदेशही सरकारने दिले आहे.
हेही वाचा -पंतप्रधान मोदी सिरम इंस्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता; कोरोना लसीचा घेणार आढावा
हेही वाचा -कोरोना लसीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले 'हे' चार महत्त्वाचे प्रश्न