मुंबई- पालिकेकडून अनेक कर वसूल केले जातात. त्यातील एक कर म्हणजे मालमत्ता कर. या कराची वसुली यावर्षी कमी झाली आहे. करवसुली वाढावी म्हणून पालिकेने नामी शक्कल शोधून काढली आहे. जे नागरिक मालमत्ता कर भरत नाहीत त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी घरासमोर बँडबाजा पथकासह दवंडी पिटण्यास सुरुवात केली आहे. शिवजयंतीच्या सुट्टीच्या निमित्ताने पालिकेच्या एच पूर्व म्हणजेच सांताक्रूझ विभागातून याची सुरुवात करण्यात आली. लवकरच अशा प्रकारची दवंडी मुंबईत सर्व ठिकाणी पिटली जाणार आहे.
मुंबई महापालिकेला सर्वात जास्त कर जकातीमधूम मिळत होता. जकात कर रद्द होऊन त्याची जागा जीएसटीने घेतली आहे. त्यामुळे पालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. पालिकेची आर्थिक गणितं बिघडू लागले आहे. त्यासाठी पालिकेने इतर कर वसुलीवर लक्ष केंदित केले आहे. पालिकेला सध्या मालमत्ता करामधून सर्वात जास्त म्हणजेच 5 हजार 500 कोटी रुपये इतका कर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षित कर पालिका वसूल करू शकलेली नाही. त्यातच 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून वगळण्यात आले आहे. या घरांना करामधून वगळले असले तरी करामधील काही भागच कमी करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना वर्षभरात मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी बिले पाठवण्यात आलेली नाहीत. सध्या मालमत्ता कराची संचित थकबाकी अंदाजे 15 हजार कोटीपर्यंत वाढली आहे. आर्थिक वर्ष समाप्ती जवळ आल्याने मालमत्ता कराची ही थकबाकी वसुलीसाठी पालिकेने वेगळी शक्कल लढवली आहे.
पालिकेकडून लग्नामध्ये वाजवण्यात येणाऱ्या बँडबाजासह विभागांत जनजागृती करण्यात येत आहे. मार्च महिना जवळ आल्याने त्याची आठवण करदात्यांना देऊन अधिकाधिक कर वसुलीसाठी प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. पालिकेच्या सांताक्रूझ येथील एच पूर्व विभाग कार्यालयाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी बँडबाजाच्या मदतीने जनजागृती सुरू केली आहे. पालिकेचे एक वाहन, त्यावर ढोलपथक, एक दवंडी पथक अशा प्रकारचे पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विभागात फिरून करदात्यांमध्ये कर भरणा करण्याबाबत जनजागृती करत आहे. आहे. शिवजयंतीच्या दिवशी असणाऱ्या सुट्टीचं निमित्त साधून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. मार्च महिना जवळ आल्याने त्याची आठवण करदात्यांना देऊन अधिकाधिक कर वसुलीसाठी प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे.